Ramraje Naik Nimbalkar
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे सातारा जिल्ह्यातील बडे नेते संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर खात्याची धाड पडली. शरद पवारांच्या पक्षातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याच्या चर्चा सुरू असतानाच ही कारवाई झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान त्यांचे बंधू माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या स्टेटसने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी अजित पवारांची साथ सोडत शरद पवार गटात प्रवेश केला होता. मात्र आता पुन्हा अजितदादांच्या गटात घरवापसी करणार असल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आज सकाळी आयकर विभागानं छापा टाकल्याची माहिती समोर आली. सकाळी 6 वाजल्यापासून पथकाकडून झाडाझडती सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. एकाच वेळी पुणे, मुंबई आणि फलटण येथील निवासस्थानी धाडी टाकण्यात आल्या आहेत.
अशातच, रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्टेटस ठेवत काळजी नसावी असं कार्यकर्त्यांना म्हटलं आहे. संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांच्या घरावरती छापा पडल्याने त्यांच्या परिसरात कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यावरती केलेली कारवाई राजकीय द्वेशातून असल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. दरम्यान, 'कृपया घरा बाहेर गर्दी करू नका, खात्याला आपले काम करू द्या, काळजी नसावी' अशी पोस्ट करत रामराजे निंबाळकरांनी केली आहे.
निंबाळकर कुटुंबाला घरातील सोन्याच्या आणि चांदीच्या वस्तू कुठून आल्या, घरात असलेली रक्कम तसेच विविध ठिकाणचे आर्थिक व्यवहार याबाबत चौकशी अधिकारी यांच्याकडून प्रश्न विचारण्यात आले आहेत. चौकशी सुरु आहे.