सग्रहीत छायाचित्र
यवतमाळ | राज्याला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यातून समोर आली आहे. येथे एका शाळेतील मुख्याध्यापक असलेल्या पत्नीने आपल्या शिक्षक पतीचा विष देऊन खून केला. विशेष म्हणजे, पतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिने शाळेतील अल्पवयीन विद्यार्थ्यांचा वापर केला. या अमानुष कृत्याचा उलगडा चौसाळा जंगलात सापडलेल्या जळालेल्या मृतदेहाच्या तपासातून झाला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
निधी आणि शंतनू देशमुख या दोघांनी वर्षभरापूर्वी प्रेमविवाह केला होता. दोघेही सनराईज शाळेत अनुक्रमे मुख्यध्यापक आणि शिक्षक होते. सुरुवातीला सर्व काही सुरळीत असले तरी, काही महिन्यांतच नात्यात वाद सुरू झाले. शंतनूला दारूचे व्यसन लागल्याने निधीने खूप त्रास सहन केला. या वादातूनच तिने पतीच्या खूनाचा निर्णय घेतला.
अल्पवयीन विद्यार्थ्यांचा वापर
निधीने शाळेतील "मिशन UPSC 2030" नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला होता, ज्यात ती विद्यार्थ्यांना सकाळी सरावासाठी मैदानावर बोलावायची. याच ग्रुपमधून तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांची निवड करून, तिने खुनाच्या कटात त्यांना सहभागी करून घेतलं. प्रथम निधीने पती शंतनूला विष देऊन ठार मारले. त्यानंतर तिने त्या तीन विद्यार्थ्यांना पहाटे सरावाच्या बहाण्याने बोलावले. त्यांनी मिळून मृतदेह दुचाकीवरून चौसाळा जंगलात नेऊन जाळला.
पोलिस तपास आणि उलगडा
काही दिवसांनंतर चौसाळा जंगलात एक अर्धवट जळालेला मृतदेह सापडला. मृतदेहाजवळ सापडलेल्या शर्टच्या तुकड्यांवरून पोलिसांनी तपास सुरू केला. शंतनू देशमुख बेपत्ता असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली. शंतनूच्या पत्नी निधीच्या वागण्यात व बोलण्यात सातत्याने विसंगती आढळल्याने, पोलिसांनी तिचा कसून तपास केला. अखेर पाच दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या निधीच्या खुनाचा पर्दाफाश झाला.
आरोपी पत्नी आणि तीन अल्पवयीन मुलं ताब्यात
यवतमाळ पोलिसांनी निधीसह तीन विधी संघर्षग्रस्त अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांचे तपास सुरू असून, निधीने या मुलांवर कसा मानसिक प्रभाव टाकला याचा तपास सुरू आहे. अल्पवयीन असल्याने त्यांच्यावर किशोर न्याय कायद्यानुसार कारवाई होणार आहे.