अक्षय शिंदेला कोणत्या कारणासाठी घेऊन जात होते याचा खुलासा आवश्यक; प्रकाश आंबेडकरांची मागणी
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा चकमकीत ठार झाला. आरोपी अक्षय शिंदेला रिमांडमध्ये घेऊन जात असताना त्याने पोलिसांचे पिस्तूल हिसकावून त्यांच्यावर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी अक्षय शिंदेवर गोळीबार केला. त्या गोळीबारात आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावरून विरोधकांनी महायुती सरकारला चांगलंच घेरलं आहे. "कोणाला तरी वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा बळी घेतला का? अक्षय शिंदेला पोलीस कशाच्या शोधासाठी घेऊन जात होते" असे काही प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित करत सरकारला सवाल केला आहे.
आंबेडकर म्हणाले, संशयाचे वातावरण दूर करण्यासाठी ज्या पोलीस अधिकाऱ्याला गोळी लागली आहे त्याचा मेडिकल रिपोर्ट शासनाने उघड करावा. म्हणजे त्याच्या संदर्भातील तथ्य समोर येईल. ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस अक्षय शिंदे याला नेमक्या कोणत्या कारणासाठी घेऊन जात होते हे देखील शासनाने उघड करावे. या दोन्ही गोष्टींबद्दल पोलिसांनी खुलासा करणे आवश्यक आहे. तेव्हाच कॉन्स्पिरसीच्या ज्या थियरीज पसरवल्या जात आहेत त्यांच्याबद्दल शंका निरसन होईल. जर या दोन्ही गोष्टींबद्दल खुलासा झाला नाही तर कुणाला तरी वाचवण्यासाठीच अक्षय शिंदेचा बळी घेतला आहे असा संशय कायम राहील असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.