”खासगी गुप्तहेराने दिली खरातच्या कॉल रेकॉर्डची माहिती”
मुंबई : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या प्रकरणात काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सीडीआर अहवालाचा हवाला देत अशोक खरातचे काही राजकीय नेत्यांशी संपर्क असल्याचे सांगत नावे जाहीर केली. यावरून शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) सुषमा अंधारे यांनी सीडीआर अहवाल हे त्यांना कसे मिळाले? यामध्ये भाजपची नावे का नाहीत? असा सवाल उपस्थित केला. पण, या सर्व आरोपांवर दमानिया यांनी प्रत्युत्तर दिले.
दमानिया यांनी सोमवारी (दि.६) पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील टीकेला चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी विरोधकांच्या आरोपांनी व्यथित झालेल्या दमानिया यांना पत्रकार परिषदेत अश्रू अनावर झाले. अशोक खरातच्या सीडीआर अहवालावरून अंधारे आणि खासदार संजय राऊत यांनी दमानिया यांच्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. “दमानिया ‘रॉ’च्या एजंट आहेत का?” आणि “या यादीत भाजपच्या नेत्यांची नावे का नाहीत?” असे सवाल विरोधकांनी केले होते.
यावर स्पष्टीकरण देताना दमानिया म्हणाल्या की, “मला १ एप्रिल रोजी एका अनोळखी व्यक्तीचा मेसेज आला. तो व्यक्ती एका खासगी गुप्तहेर कंपनीचा मालक होता. त्याने मला खरातच्या कॉल रेकॉर्डची एक्सेल शीट पाठवली. मी त्या माहितीची तांत्रिक तपासणी केली आणि क्लाऊड ॲपच्या मदतीने ते नंबर कोणाचे आहेत, हे शोधून काढले.” ही सर्व माहिती आपण पोलीस महासंचालक आणि संबंधित यंत्रणांना पाठवली असल्याचेही त्यांनी स्पष्ट सांगितले.
आम्ही विषयांवर लढतो, दमानियांचा पलटवार
सुषमा अंधारे यांच्या टीकेला उत्तर देताना दमानिया म्हणाल्या की, “आम्ही विषयांवर लढतो, फालतूचे राजकारण करत नाही. या सीडीआरमध्ये केवळ सत्ताधाऱ्यांचीच नव्हे, तर मिलिंद नार्वेकर यांचाही नंबर आला आहे. त्यांचे खरातशी आठ वेळा बोलणे झाले आहे, त्याची चौकशी का करत नाही? खरातच्या विरोधात लढण्याऐवजी माझ्यावरच आरोप का केले जात आहेत?” यावेळी बोलताना दमानिया प्रचंड भावूक झाल्या होत्या. “माझ्या अटकेची मागणी केली जात आहे, माझ्यावर खालच्या पातळीवर टीका केली जात आहे. तुमचे विचार तुमच्या खिशात ठेवा, मला कोणाचीही भीती वाटत नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
प्रकरणात मिलिंद नार्वेकरांचे नाव आल्याने खळबळ
अंजली दमानिया यांनी यापूर्वीच अशोक खरातचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील, सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांच्याशी संपर्क असल्याचे दावे केले होते. आता मिलिंद नार्वेकर यांचेही नाव घेतल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. भोंदूगिरीच्या या प्रकरणाने आता सत्ताधारी आणि विरोधक समोरासमोर आले असून, आगामी काळात हे प्रकरण अधिक गाजण्याची शक्यता आहे.


