Pandharpur | ‘एकात्मिक सनियंत्रण कक्ष’ व ‘हरित वारी’ ॲपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन

यादरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवनचे भूमिपूजन करण्यात आले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Swapnil Hajare
  • Sun, 6 Jul 2025
  • 08:09 am
Maharashtra news,Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune,

पंढरपूर  (दि. ५): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्यावतीने पंढरपूर आषाढी वारीच्या संनियंत्रणासाठी शहर पोलीस ठाण्याच्या मागे स्थापन करण्यात आलेला एकात्मिक सनियंत्रण कक्ष, हरित वारीच्या उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या ‘हरित वारी’ ॲपचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले.

आषाढी वारी मार्ग, नदीपात्र, वाळवंट, वाखरी पालखी तळ, 65 एकर परिसर, पत्रा शेड, प्रदक्षिणा मार्ग, मंदिर परिसर या ठिकाणी ड्रोन कॅमेरे तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून अहोरात्र गर्दीचे संनियंत्रण केले जात आहे. कोठे काही घटना घडल्यास तत्काळ नियंत्रण कक्षातील स्क्रीनवर दिसत असल्याने त्या ठिकाणी गतीने पोहोचून स्थिती नियंत्रणात आणता येत आहे असे,  पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी सांगितले. या एकात्मिक सनियंत्रण कक्षाद्वारे प्राप्त चित्रीकरणाच्या विश्लेषणातून आषाढी वारीसाठी कालपर्यंत पंढरपूर शहरात सुमारे 14 लाख वारकरी दाखल झाल्याचा अंदाज असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

‘हरित वारी’ ॲपचे उद्घाटन

सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्यावतीने कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत ‘हरित वारी’ हा उपक्रम राबविण्यात येत असून त्याच्या संनियंत्रणासाठी तयार करण्यात आलेल्या ‘हरित वारी’ ॲपचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले.

‘हरित वारी’ उपक्रमांतर्गत दीड लाखावर वृक्षांची लागवड सोलापूर ग्रामीण हद्दीत विविध ठिकाणी करण्यात येणार आहे. प्रत्येक झाडाला स्वतंत्र क्यूआर कोड दिला जाणार आहे. ह्या माध्यमातून प्रत्येक झाडाची जात, त्या झाडाचे जिओ लोकेशन आणि त्याच्या सद्यस्थितीबाबत माहिती उपलब्ध असणार आहे. ॲपचा वापर करण्याचे प्रशिक्षण ठाणे अंमलदारांना  देण्यात आले आहे. हे ॲप ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित असल्याने वृक्षारोपण मोहिमेतील विश्वासार्हता, पारदर्शकता आणि डिजिटल ट्रॅकिंग शक्य होणार आहे, असे यावेळी कुलकर्णी यांनी सांगितले.

राज्य सहकारी बँकेच्यावतीने देवस्थान समितीला इलेक्ट्रिक वाहन प्रदान

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्यावतीने विठ्ठल रुख्मिणी देवस्थान समितीला भक्तांच्या सेवेसाठी इलेक्ट्रिक वाहन प्रदान करण्यात आले.

मुख्यमंत्र्याच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवनचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, अभिजित पाटील, गोपीचंद पडळकर, सचिन कलशेट्टी, डॉ.बाबासाहेब देशमुख, माजी आमदार प्रशांत परिचारक, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे आदी उपस्थित होते.

Share this story

Latest