Pandharpur | शेतीची उत्पादकता वाढविण्यावर शासनाचा भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

'कृषी पंढरी' प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, पाच वर्षात कृषी क्षेत्रात २५ हजार कोटींची गुंतवणूक करणार....

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Swapnil Hajare
  • Sun, 6 Jul 2025
  • 07:52 am

‘कृषी पंढरी’ कृषी प्रदर्शन....

पंढरपूर : शेतकऱ्याला शेती फायद्याची व्हावी, यासाठी उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढावी असा राज्य शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आगामी काळात शेतीच्या सर्व फिडरचे सौर ऊर्जीकरण करण्याचा शासनाने निर्णय घेतलाअसून या योजनेत महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा प्रथम असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित ‘कृषी पंढरी’ कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी (दि. ५) ते बोलत होते. 

उत्पादन खर्च कमी होणे आणि उत्पादकता वाढावी, यासाठी राज्य शासन अनेक योजना राबवित आहे, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत गाव हा घटक धरून जलसंधारण, जलनियोजन, शेतीच्या यांत्रिकीकरणापासून बाजारसाखळी तयार करण्यापर्यंत पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन अशा सर्व बाबी गावात पूर्ण करून गावातल्या छोट्यातल्या छोट्या शेतकऱ्याला सर्व शासकीय योजनांचा लाभ होईल, असा प्रयत्न करण्यात आला आहे. पिक विमा योजना नुकतीच सुधारित केली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, शेती क्षेत्रात यावर्षीपासून येत्या ५ वर्षात दरवर्षी ५ हजार याप्रमाणे २५ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ठिबक संच, कृषी यांत्रिकीकरण, शेततळे, पंप आदी देण्यात येणार आहे. गतकाळात निर्णय घेतल्याप्रमाणे साडेसात अश्वशक्ती पर्यंतच्या कृषी पंपांचे वीजबिल आकारले जात नाही.

पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी शेतकऱ्यांना शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, योजनांचा लाभ घेण्याची माहिती मिळावी यासाठी कृषी प्रदर्शन भरवावे, अशी अपेक्षा माजी आमदार दिवंगत सुधाकरपंत परिचारक यांनी २०१५ साली व्यक्त केली होती. तेव्हापासून दरवर्षी हे प्रदर्शन भरविण्यात येत आहे. यामध्ये शासनाचे विविध विभाग, कृषी विद्यापीठे यांचे स्टॉल, विविध योजना, वेगवेगळ्या व्यावसायिकांनी आणि शेतकऱ्यांनी केलेल्या यशस्वी प्रयोगांचाही समावेश आहे. एकात्मिक कीड नियंत्रणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’चा वापर, उत्पादकता वाढविण्यासाठीच्या वेगवेगळी पद्धतींचेही प्रदर्शन या ठिकाणी पहायला मिळत आहे. सेंद्रिय खते, नैसर्गिक खते, वेगवेगळ्या खतांचे मिश्रणे, माती परीक्षण ते कापणीपर्यंत पर्यंतच्या तंत्रज्ञानाची झलक येथे पाहायला मिळते, असे मुख्यमंत्री म्हणाले.

शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पणनच्या योजनांचा लाभ बाजार समित्यांच्या माध्यमातून मिळत आहे. गावातील विकास सहकारी संस्थांचे बहुउद्देशीय संस्थात रूपांतरण करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असून १८ प्रकारचे व्यवसाय या संस्थाना करता येणार आहेत. बाजार आणि शेतकऱ्यांमध्ये दुवा ठरण्याचे काम या संस्था करतील. स्टोरेज, कोल्ड स्टोरेज आदी व्यवस्था करून शेतकऱ्यांच्या माल योग्य भावात मोठ्या प्रमाणात माल विकला जाईल, असा प्रयत्न असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती अत्यंत प्रगतशील असून चांगले काम करते. समितीने पणन विभागाच्या सर्व योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

Share this story

Latest