संजय राऊत जे तुरुंगात गेले होते, ते देशसेवेसाठी किंवा कुठल्या आंदोलनात सहभागी झाले होते म्हणून गेले नव्हते. तर पत्राचाळ प्रकरणात गैरव्यवहार केला, म्हणून तुरुंगात गेले. या प्रकरणातील साक्षीदार आणि जे जबाब देणारे होते, त्यांना शिवीगाळ केली. याही गोष्टी व्हायरल झालेल्या आहेत. ‘नरकातला स्वर्ग’चे श्रेय स्वप्ना पाटकर यांना दिले पाहिजे, अशा शब्दांत शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
उद्धवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी लिहिलेल्या ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ लेखक, कवी जावेद अख्तर यांच्या हस्ते व राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाले. त्यावेळी ठाकरे व पवार यांनी सरकारवर टीका केली. ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. शिवसेना शिंदे गटातील नेत्या नीलम गोऱ्हे यांनी यावरून संजय राऊतांवर जोरदार टीका केली.
पत्रकारांशी बोलताना नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, ‘नरकातला स्वर्ग’ संजय राऊतांनी लिहिले. संजय राऊत जे तुरुंगात गेले होते, ते देशसेवेसाठी किंवा कुठल्या आंदोलनात सहभागी झाले होते, म्हणून गेले नव्हते. तर पत्राचाळ प्रकरणात गैरव्यवहार केला, म्हणून तुरुंगात गेले. या प्रकरणातील साक्षीदार आणि जे जबाब देणारे होते, त्यांना शिवीगाळ केली. याही गोष्टी व्हायरल झालेल्या आहेत. ‘नरकातला स्वर्ग’चे श्रेय स्वप्ना पाटकर यांना दिले पाहिजे. त्यांना जर अशा प्रकारे धमकावले गेले नसते, तर न्यायालयाने याची दखल घेऊन तुरुंगात पाठवले नसते. पत्राचाळीत गोरगरीब माणसाच्या घरांमध्ये जो माणूस गैरव्यवहार करतो, मनी लाँड्रिंग करतो, त्यांनी हे सगळे दावे करायचे, केंद्रीय गृहमंत्री भेटले, मुख्यमंत्री भेटले, हा प्रकार स्वतःच्या गुन्ह्यावरून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा आहे. ही धूळफेक आहे, अशी टीका नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.
‘लाडक्या बहिणी’ या महायुती सरकारवर समाधानी
राज्यातील लाडक्या बहिणी या महायुती सरकारवर समाधानी आहेत. महिलांना सक्षम करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. लाडक्या बहिणींच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. महायुती सरकारच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, पिंक रिक्षा आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, अशा योजना राबवल्या जात असल्याचे त्या म्हणाल्या.
सणसणाटी निर्माण करणारा नरकातील किडा
संजय राऊत म्हणजे, विनाकारण काहीही बिनबुडाचे वक्तव्य किंवा आरोप करून सणसणाटी निर्माण करणारा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रकारचा नरकातील किडाच आहे, अशी बोचरी टीका शिवसेना उपनेते व माजी आमदार शहाजी पाटील यांनी संजय राऊत लिखित ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकावरून केली आहे.संजय राऊत हे महाराष्ट्राने दुर्लक्षित केलेले आणि नाकारलेले नेते आहेत. त्यांचा दररोजचा सकाळी वाजणारा भोंगा बंद करण्यासाठीच महाराष्ट्रातील जनतेने विधानसभेत महायुतीला विक्रमी बहुमत दिले. तरीही, संजय राऊत ‘गिरे तो भी टांग उपर’ या उक्तीप्रमाणे सतत वादग्रस्त वक्तव्य करीत आहेत. संजय राऊत यांनी लिहिलेल्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाला त्यांनी ‘नरकातला किडा’ असे नाव द्यायला हवे होते, असा खोचक टोलाही या पत्रकार परिषदेतून पाटील यांनी लगावला.