Sharad Pawar,Maharastra Kesari 2025
राज्यात सध्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या वादाची चर्चा जोरदार रंगली आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम विजेता पृथ्वीराज मोहळ ठरला. पण पैलवन शिवराज राक्षेच्या अतिरागामुळं स्पर्धेला गालबोट लागले. शिवराज राक्षेने पंचावरील निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत थेट लाथ मारली. त्यामुळं राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यानं मोठी मागणी केली आहे. त्यामुळं 'महाराष्ट्र केसरी' स्पर्धा रंगणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
अहिल्यानगरमध्ये रविवारी (२ फेब्रुवारी) महाराष्ट्र केसरी स्पर्धेची उपांत्य आणि अंतिम फेरी पार पडली. या स्पर्धेत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने यंदाचा महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकला. उपांत्य फेरीत पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात सामना रंगला. मात्र, अवघ्या ४० सेकंदांत पंचांनी पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित केले. या निर्णयावर शिवराज राक्षेने आक्षेप घेत पंचांशी वाद घातला. त्याच्या संतापाचा अतिरेक इतका वाढला की त्याने एका पंचाला लाथ मारली. या प्रकारानंतर कुस्तीगीर परिषदेकडून कडक कारवाई करण्यात आली आहे. परिणामी शिवराज राक्षे याला तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
हा वादा सुरु असून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्र केसरी पुन्हा एकदा परिषदेच्या माध्यमातून शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली कर्जत जामखेडमध्ये घ्यावी अशी विनंती केली असल्याचे सांगितलं आहे.
नेमकं रोहित पवार काय म्हणाले?
महाराष्ट्र केसरी परत एकदा आणि ते सुद्धा परिषदेच्या माध्यमातून सत्तर वर्ष जी परिषद सुरू आहे त्याच्या माध्यमातून कर्जत जामखेड मध्ये घ्यावी अशी मी विनंती केली असल्याचे रोहित पवार म्हणाले. तसेच, कुठल्याही पैलवानाला जिंकण्यासाठी आम्ही महाराष्ट्र केसरी घेणार नाही, पण शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली पैलवानांना खऱ्या अर्थाने निष्पक्षपणे व्यासपीठ देणार आहोत, अशी ग्वाहीदेखील रोहित पवारांनी यावेळी दिली. त्यामुळं राज्यात पुन्हा कुस्ती स्पर्धा रंगणार या चर्चेला उधाण आलं आहे.
शिवराज राक्षेला पाठिंबा दर्शवत राजकीय नेत्यांवर सोडलं टीकास्त्र
माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी राजकीय नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेवेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अनेक बडे नेते उपस्थित होते. हाच मुद्दा हाती घेत, रोहित पवार म्हणाले, परवा जी काही संघटना अहिल्यानगर मध्ये महाराष्ट्र केसरी आयोजित केली ती पैलवानांसाठी केली होती का नेत्यांसाठी हेच कळत नाही, तिथे जिथे मॅच ठेवली होती जिथे कुस्ती चालू होती तिथं तज्ञ कमी आणि पंच कमी मात्र, नेते जास्त अशी परिस्थिती तिथे होती. अशा शब्दात हल्लाबोल केला.
तसेच, अहिल्यानगरमध्ये झालेल्या कुस्तीचे ज्यांनी आयोजन केले ती संघटना तीन वर्षांपूर्वी स्थापन झाली आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद ही दुसरी संघटना आहे. जी संघटना 70ते 80 वर्ष झाले या क्षेत्रात काम करत आहे आणि महाराष्ट्र केसरीचे आयोजन हे ती संघटना करत असते.
घेण्यात आलेली कुस्ती स्पर्धा कुठल्यातरी पैलवानाला जिंकवण्यासाठी घेतली होती का काय असा संशय व्यक्त करत रोहित पवार म्हणाले, जो निकाल लागला यामध्ये सुद्धा पैलवानावर अन्याय झाला हे सगळं योग्य नाही. त्यामुळे महाराष्ट्र केसरी पुन्हा एकदा परिषदेच्या माध्यमातून शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली कर्जत जामखेडमध्ये घ्यावी अशी मी विनंती केली आहे. कुठल्याही पैलवानाला जिंकवण्यासाठी आम्ही ही स्पर्धा घेणार नाही. जर ही गोष्ट मान्य केली तर खरी महाराष्ट्र केसरी मार्च अखेर आपल्याला बघायला मिळेल, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.