Maharashtra | राज्यात 1 जानेवारी 2025 पासून 5 वाघांचा नैसर्गिक तर 3 वाघांचा अपघाती मृत्यू ,वन विभागाची माहिती....

वर्धा वनविभागातील समुद्रपूर येथे एका बछड्यांचा रस्ते अपघातात 22 जानेवारी 2025 रोजी मृत्यू झाला असून शव विच्छेदन अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याचे वन विभागाने कळविले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 23 Jan 2025
  • 02:08 pm
death of  tigers,

प्रातिनिधिक छायाचित्र....

तीन वाघांच्या शिकारीची चौकशी सुरु

मुंबई : महाराष्ट्रात1 जानेवारी 2025 पासून 5 वाघांचा नैसर्गिक मृत्यू झाला असून 3 वाघांचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर 3 वाघांची शिकार करण्यात आली असून याबाबत चौकशी सुरु असल्याचे वन विभागाने कळविले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी व वनपरिक्षेत्रात 2 जानेवारी 2025 रोजी वाघांच्या आपसातील हल्ल्यात मृत्यू झाला. भंडारा जिल्ह्यातील तुमसर वनपरिक्षेत्रात 6 जानेवारी रोजी एका वाघिणीचा विजेच्या धक्क्यामुळे मृत्यू झाला. या वाघाच्या शिकारीत सहभागी असलेल्या तीन आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

पांढरकवडा वनविभाग अंतर्गत वणी येथे 7 जानेवारी रोजी एका वाघिणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला असून या वाघिणीचे दात, पंजे गायब असल्याने या प्रकरणाचा तपास सुरू आहे. नागपूरच्या देवलापार वनपरिक्षेत्रात 8 जानेवारी रोजी एका बछड्याचा विजेचा धक्का देऊन मृत्यू झाला असल्याचे आढळून आल्याने या प्रकरणाचा तपास सुरू आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र वनक्षेत्रातील मूल वनपरिक्षेत्रात 9 जानेवारी रोजी एका बछड्याचा नैसर्गिक मृत्यू झाला.

गोंदिया येथील दासगाव वनपरिक्षेत्रात दिनांक 14 जानेवारी रोजी आजारपणामुळे एका वाघाचा मृत्यू झाला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. नागपूर येथील देवलापार वनपरिक्षेत्रात 15 जानेवारी रोजी एका बछड्याचा नैसर्गिक मृत्यू झाला. ब्रह्मपुरी वनक्षेत्रातील सिंदेवाही वनपरिक्षत्रात 19 जानेवारी 2025 रोजी रेल्वेला घडकून अपघात झाला आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प शिवणी वनपरिक्षेत्रातील एका बछड्याचा दिनांक 20 जानेवारी रोजी नैसर्गिक मृत्यू झाला तर 21 जानेवारी रोजी पेंच  व्याघ्र प्रकल्प नागलवाडी वनपरिक्षेत्रात एका वाघाचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे. तसेच वर्धा वनविभागातील समुद्रपूर येथे एका बछड्यांचा रस्ते अपघातात 22 जानेवारी 2025 रोजी मृत्यू झाला असून शव विच्छेदन अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याचे वन विभागाने कळविले आहे.

Share this story

Latest