संग्रहित छायाचित्र
मुंबई महापालिकेने केंद्र सरकारच्या निर्णयानुसार १ जानेवारी, २०२५ पासून पूर्वलक्षी प्रभावाने महागाई भत्त्यात २ टक्केने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये वाढ होऊन तब्बल १ लाख ५ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांसह निवृत्तिवेतनधारकांना याचा फायदा होणार आहे.
५३ टक्केवरून, ५५ टक्केपर्यंत वाढ १ जानेवारी, २०२५ च्या पूर्वलक्ष प्रभावाने करण्यात येणार असल्यामुळे मागील चार महिन्यांची थकबाकीही कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. महागाई भत्त्याचा लाभ महानगरपालिका समय वेतनश्रेणीतील पूर्णकालिक कर्मचारी, निवृत्तिवेतनधारक, कुटुंब निवृत्तिवेतनधारक, वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवर्गातील कर्मचारी, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वेतनश्रेणीत वेतन घेणारे अध्यापकीय कर्मचारी यांना होणार असल्याचे पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले. महापालिकेच्या माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता अनुज्ञेय असणार नसल्याचे परिपत्रकामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. सहावा वेतन आयोगावेळी महागाई भत्ता संदर्भात कामगार संघटना व महापालिका प्रशासन यांच्यामध्ये करार झाला होता. त्यानुसार त्यानुसार महापालिकेने हा महागाई भत्ता वाढवण्यात आला आह, असे दि म्युनिसिपचे सरचिटणीस रमाकांत बन यांनी सांगितले.
मूळ वेतनानुसार अशी होणार वाढ...
कामगार : मूळ वेतन : १८ हजार आता मिळत असलेला महागाई भत्ता : ९ हजार ५४० भत्ता वाढीनंतर: ९ हजार ९०० बाह: ३६०
वरिष्ठ अधिकारी : मूळ वेतन: ७० हजार आता मिळत असलेला महागाई भत्ता ३७ हजार १०० भत्ता वाढीनंतर ३८ हजार ५०० वाढ : १ हजार ४००
मुख्य लिपिक : मूळ वेतन: ३४ हजार ५०० आता मिळत असलेला महागाई भत्ता १८ हजार २८५ भत्ता वाढीनंतर १८ हजार ९७५ वाढ : ७२०
महागाई भत्ता जानेवारी ते एप्रिलच्या थकबाकीसह लागू झाल्याने खूप आनंद झाला. महिन्याच्या मूळ पगारानुसार दोन टक्के वाढ झाली आहे. वाढत्या महागाईनुसार महागाई भत्ता वाढत असतो. मात्र महागाई भत्ता वेळेत वाढला तर खर्चाचा ताळमेळ बसवता येतो. त्यामुळे तो वेळेत मिळाला तर बरे होईल. - प्रवीण अभंग, जलमापक निरीक्षक