Mumbai | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यापन कारकीर्दही प्रेरणादायी – सरन्यायाधीश भूषण गवई

डॉ.आंबेडकर यांच्या अध्यापन कारकीर्दीस ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शासकीय विधि महाविद्यालय येथे स्मृतिपटलाचे अनावरण

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Swapnil Hajare
  • Sun, 6 Jul 2025
  • 09:03 am
Maharashtra news,Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune,

मुंबई : विविध विषयांचे अभ्यासक व तज्ज्ञ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्त्व विधिज्ञ, अर्थतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ असे बहुआयामी होते. शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यापन कारकीर्दही मोलाची आणि प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन शनिवारी(दि. ०५) सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले.

शासकीय विधी महाविद्यालय येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्राध्यापक आणि प्राचार्य, कारकीर्दीला 90 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त स्मृतीपटलाचे अनावरण आणि सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण आर. गवई यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे, न्यायमूर्ती मनिष पितळे, महाधिवक्ता बीरेंद्र सराफ व प्राचार्य डॉ. अस्मिता वैद्य हे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर व जीवनावर आधारित चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. शासकीय विधि महाविद्यालयाच्या वतीने मानपत्र देऊन सरन्यायाधीश भूषण गवई यांचा गौरव करण्यात आला. विविध संस्था तसेच मान्यवरांनीही यावेळी सरन्यायाधीश गवई यांचा गौरव केला.

सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्व व्यासंगी व बहुआयामी होते. ते एक उत्कृष्ट शिक्षक असल्याने त्यांच्या विविध क्षेत्रातील योगदानाबरोबरच त्यांची अध्यापन कारकीर्दही प्रेरणादायी ठरली. शासकीय विधि महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य करीत असतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील दुर्बल घटकांवरील अन्यायाला वाचा फोडण्याचे कार्य सुरू केले. 1935 च्या गव्हर्मेंट ऑफ इंडिया या अॅक्टमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान मोलाचे ठरले.

शासकीय विधि महाविद्यालयाला देदीप्यमान शैक्षणिक वारसा लाभला असून अनेक विधिज्ञ या महाविद्यालयातून घडले. महाविद्यालयाच्या विविध समित्यांचे वैशिष्ट्यपूर्ण कार्यही अभिनंदनीय आणि अनुकरणीय असल्याचे गौरवोद्गार सरन्यायाधीश गवई यांनी काढले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य केले त्या ठिकाणी गौरव होणे व शासकीय विधि महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असल्याचा सार्थ अभिमानाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

प्राचार्य अस्मिता वैद्य प्रास्ताविकात म्हणाल्या, शासकीय विधि महाविद्यालयाला देदीप्यमान शैक्षणिक वारसा लाभला असून अनेक नामवंत विधिज्ञ या महाविद्यालयाने घडविले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून 1935 मध्ये अध्यापन कारकीर्दीस सुरुवात केली. न्यायशास्त्रासारख्या अत्यंत गहन विषयाचे अध्यापन डॉ. आंबेडकर करीत असत. या महान कार्याला 90 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गौरवार्थ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विधि सेवा क्षेत्रात महाविद्यालयाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचेही वैद्य यांनी सांगितले.

या कार्यक्रमास सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले, न्यायाधीश रेवती ढेरे, न्यायाधीश नीला गोखले, कुलगुरू डॉ. दिलीप उके, कुलगुरू डॉ हेमलता बागला, कुलगुरू डॉ अपूर्वा पालकर, कुलगुरू डॉ. गोसावी, प्रधान सचिव सुवर्ण केवले, सिनियर कौन्सेल र‍फिक दादा,  बार कौन्सिल अध्यक्ष विठ्ठल कोंडे-देशमुख, प्रिन्सेस आशाराणी गायकवाड व मान्यवर उपस्थित होते.

Share this story

Latest