MPSC: प्रदीप आंबरे राज्यात पहिला तर अमृता शिरके दुसरी, अन्न व औषध प्रशासकीय सेवा परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ या परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती २ व ३ जानेवारी २०२५ आणि ७ ते १० जानेवारी २०२५ आणि १५ व १६ जानेवारी २०२५ रोजी नवी मुंबई केंद्रावर घेण्यात आल्या होत्या.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 23 Jan 2025
  • 05:21 am
MPSC , Pradeep Ambre , Amrita Shirke , Food and Drug Administrative Service Exam, Merit List,  एमपीएससी, प्रदीप आंबरे, अमृता शिरके, अन्न व औषध प्रशासकीय सेवा परीक्षा, मराठी बातम्या

संग्रहित

 महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ या परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती २ व ३ जानेवारी २०२५ आणि ७ ते १० जानेवारी २०२५ आणि १५ व १६ जानेवारी २०२५ रोजी नवी मुंबई केंद्रावर घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर संबंधित उमेदवारांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

 

प्रस्तुत सर्वसाधारण गुणवत्ता यादी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई येथे डॉ. मलकप्पा मुरग्याप्पा पाटील व इतर प्रकरणी न्यायाधिकरणाने २० जानेवारी २०२५ रोजी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने तसेच विविध न्यायाधिकरणे, उच्च न्यायालय, मुंबई आणि सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे सदर परीक्षेबाबत दाखल प्रकरणांच्या अंतिम न्यायनिर्णयाच्या अधीन राहून प्रसिध्द करण्यात आली असे आयोगाने सांगितले आहे.

 

अन्न व औषध प्रशासकीय सेवेमध्ये राज्यातून प्रदीप वसंत आंबरे हा उमेदवार राज्यात पहिला आला आहे. इतर मागासवर्ग प्रवर्गातील हा उमेदवार असून त्याला ३०२ गुण मिळाले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर अमृता शिरके तर तिसऱ्या क्रमांकावर प्रणव चंद्रकांत मोरे आला आहे. आयोगाने ६१५ उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. तसेच या उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचनाही दिल्या आहेत.

 

गुणवत्ता यादीतील उमेदवारांनो इकडे लक्ष द्या..

प्रस्तुत परीक्षेची सदर सर्वसाधारण गुणवत्ता यादी निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची आहे. अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्रे / कागदपत्रे पडताळणी करताना काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये बदल होऊ शकतो व पर्यायाने उमेदवारांचा गुणवत्ताक्रम बदलू शकतो, उमेदवार अपात्र ठरू शकतो.

प्रस्तुत परीक्षेच्या अधिसूचित संवर्ग/पदासाठी पसंतीक्रम विकल्प सादर करण्याकरिता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ऑनलाईन सुविधा या मेनूमध्ये पोस्ट प्रिफरन्स वेबलिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर वेबलिंक २२ जानेवारी २०२५ रोजी १२.०० वाजेपासून २८ जानेवारी २०२५ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.

वेबलिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या २ संवर्गाकरीता १ ते २ मधील पसंतीक्रम अथवा नो प्रिफरन्स विकल्प निवडणे अनिवार्य आहे.

अधिसूचित सर्व संवर्गाकरिता / पदांकरिता १ ते २ मधील पसंतीक्रम निवडणाऱ्या उमेदवारांचा त्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार सर्व पदांवरील निवडीकरीता विचार होईल.

अधिसूचित २ संवर्गापैकी पदांपैकी ज्या पदांवरील निवडीकरिता इच्छुक आहे; केवळ त्याच पदाकरिता पसंतीक्रम सादर करावेत. ज्या पदांवरील निवडीकरिता इच्छुक नाही; त्या पदांकरीता नो प्रिफरन्स हा विकल्प निवडावा.

संवर्गाचे पसंतीक्रम सादर केल्यानंतर डाऊनलोड पीडीएफ हा पर्याय निवडून उमेदवारास सादर केलेले पसंतीक्रम जतन करून ठेवता येऊ शकतील.

पसंतीक्रम सादर करणारे उमेदवार ज्या संवर्ग / पदांकरीता पसंतीक्रम सादर करतील केवळ त्याच संवर्ग/पदांवरील निवडीकरीता त्यांचा विचार करण्यात येईल.

Share this story

Latest