संग्रहित छायाचित्र
मुंबई: सर्वसामान्य प्रवाशांना धार्मिकस्थळांना भेटी देता याव्यात यासाठी खासगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी राज्य परिवहन (एसटी) महामंडळासोबत संयुक्तपणे सहलींचे आयोजन करावे. जेणेकरून सर्वसामान्य प्रवाशांना कमी खर्चात निवास आणि भोजन व्यवस्थेसह धार्मिक पर्यटनाचा आनंद लुटता येईल. या योजनेत राज्यातील सर्व टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले.
एसटी महामंडळाच्या मुख्यालयात सोमवारी झालेल्या बैठकीस एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, सर्व खातेप्रमुख यांच्यासह खासगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सरनाईक म्हणाले की, राज्यातील गोरगरीब जनतेला धार्मिक पर्यटन घडावे, यासाठी खासगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी एसटी महामंडळाच्या माध्यमातून कमी गर्दीच्या दिवसात सहलीचे आयोजन करावे. पंढरपूरच्या धर्तीवर तीर्थक्षेत्री भाविक, पर्यटकांना स्वच्छतागृह व निवास व्यवस्था (जिथे उपलब्ध असेल तिथे) निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येईल. कमी गर्दीच्या हंगामामध्ये विशेषतः सुट्ट्यांच्या दिवशी एसटीला प्रवासी भारमान कमी असते. त्यामुळे उत्पन्न कमी मिळते. अशा वेळी एसटीने खासगी टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी धार्मिक स्थळी सहलीचे आयोजन केल्यास त्यातून एसटी महामंडळाला उत्पन्न मिळेल, तसेच सर्वसामान्य प्रवाशांना किफायतशीर दरात पर्यटनचा आनंद लुटता येईल.
खासगी टूर्स आणि ट्रॅव्हल्स कंपन्यांनी एसटी महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने कमी गर्दीच्या दिवशी पर्यटकांच्या मागणीनुसार अष्टविनायक दर्शन, तुळजापूर-पंढरपूर-अक्कलकोट दर्शन, ज्योतिर्लिंग दर्शन, त्रंबकेश्वर-नाशिक दर्शन अशा धार्मिक सहलींचे आयोजन करावे. तथापि, या उपक्रमाला येत्या श्रावण महिन्यापासून सुरुवात करावी, अशी सूचना सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला केली. वृत्तसंंस्था