सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या कथित अवमानाविषयी महाराष्ट्र बार कौन्सिलने कठोर भूमिका घेतली आहे. कौन्सिलने या प्रकरणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सरन्यायाधीशांचा अवमान करणाऱ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली? अशी विचारणा केली आहे.
सरन्यायाधीश गवई यांच्या दौऱ्यात मुंबईचे पोलीस आयुक्त, राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला आणि राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक अनुपस्थित होत्या. हा राजशिष्टाचाराचा भंग असल्याचे लक्षात येताच सबंध यंत्रणेत खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे यासंदर्भात स्वतः सरन्यायाधिश गवई यांनीदेखील तीव्र नाराजी व्यक्त करत भाषणात उल्लेख केला होता.
दरम्यान, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे अध्यक्ष ॲड विठ्ठल कोंडे देशमुख यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. देशाचे सरन्यायाधीश गवई हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले हा महाराष्ट्रासाठी अत्यंत भूषणाचा विषय होता. कौन्सिलने त्यांचा सत्कार केला त्या कार्यक्रमाला तीन हजाराहून अधिक वकील उपस्थित होते. मात्र राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांनी योग्य तो शिष्टाचार पाळण्यात आला नाही.
या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांवर एक महिन्याच्या आत अत्यंत कडक कारवाई करण्यात यावी. काय कारवाई केली याबाबत बार कौन्सिल ला कळविण्यात यावे. अन्यथा बार कौन्सिलला पुन्हा एकदा बैठक घेऊन याबाबत पुढील कारवाई करण्याचा विचार करावा लागेल, असा इशारा पत्राद्वारे देण्यात आला आहे.
सरन्यायाधीश गवई यांचा मुंबई दौरा विविध कारणांनी चर्चेत राहिला आहे. त्यानंतर तातडीने व धावपळ करीत राज्य शासनाने सरन्यायाधीश गवई यांना राज्य अतिथी हा दर्जा बहाल केला. मात्र आता या पत्रामुळं राज्या नव्या वादाला तोंड फुटलं आहे. थेट बार कौन्सिलने यात उडी घेतल्याने राज्याच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्री काय कारवाई करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
नेमकं प्रकरण काय?
न्यायमूर्ती भूषण गवई यांनी नुकतेच देशाचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून पद व गोपनीयतेची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर 18 एप्रिल रोजी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर आले होते. सरन्यायाधीशपदी निवड झाल्यानंतर ते पहिल्यांदाच मुंबईला आले होते. चैत्यभूमीवर जाण्यापूर्वी मुंबईत बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा यांच्यातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. पण या सोहळ्याला राज्याचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक व मुंबईचे पोलिस आयुक्त या तिघांपैकी कुणाचीही उपस्थिती नव्हती.
सरन्यायाधीश भूषण गवई यांनी या अनुपस्थितीची शेलक्या शब्दांत दखल घेतली. महाराष्ट्रातील एका व्यक्ती देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश म्हणून पहिल्यांदा राज्यात आला. त्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहणे हे महाराष्ट्राच्या मुख्य सचिव, पोलिस महासंचालक व मुंबईच्या पोलिस आयुक्तांना योग्य वाटत नसेल तर त्यावर त्यांनी विचार केला पाहिजे, असे ते म्हणाले होते.