खरातसोबत फोटो असलेल्या सर्वांचे राजीनामे घेण्याची नाना पटोलेंची मागणी
मुंबई : अशोक खरात प्रकरणावरून विरोधकांनी सोमवारी (दि. २३) सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. या घटनेत गुंतलेल्या सर्वांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी केली. याला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस याप्रकरणी गंभीरपणे कारवाई करीत असल्याचे सांगितले.
कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या आक्रमक शैलीत या संदर्भातील घटनेवर गांभीर्याने कारवाई करण्याची मागणी सरकारकडे केली. दुसरीकडे नाना पटोले यांनी अशोक खरातसोबत ज्यांचे फोटो आहेत, त्या सर्वांचेच राजीनामे घेतले जावे, अशी मागणी केली. विरोक्षकांच्या या आक्रमक भूमिकेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावर सविस्तर भाष्य केले आहे.
अशोक खरात या भोंदूबाबामुळे संपूर्ण राज्याची बदनामी झाली आहे. विधवा महिला, गरोदर महिला आणि लहान मुलींचे शोषण या भोंदूबाबाने केले आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला आहे आणि ज्यांचे ज्यांचे या भोंदूबाबासोबत फोटो समोर आले आहेत, त्यांनीही आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. म्हणूनच नियम १०१ अन्वये तातडीने चर्चा करून हा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्यात यावा, अशी मागणी कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी केली.
फडणवीस म्हणाले, ‘‘जो विषय घडलेला आहे तो अत्यंत गंभीर आहे. भोंदू बाबा अशोक खरात या व्यक्तीने आपल्या तथाकथित शक्तींचा दुरुपयोग करून आणि दिशाभूल करून अनेक महिला ज्या आहेत यांच्यासोबत गैरव्यवहार, दुष्कृत्य केल्याचं समोर येतंय. या संदर्भातील कारवाई ही आपल्या पोलिसांनी प्रो-ॲक्टिव्हली केलेली आहे. याचा ट्रॅप तयार करून ती केलेली आहे. या प्रकरणामध्ये फसवणूक झालेल्या महिला समोर यायला तयार नव्हत्या. त्यांना धीर देऊन तयार केल्यावर आता काही महिलांनी तक्रार केलेली आहे. उर्वरित अजून काही महिला या संदर्भात तक्रार करतील.’’
या संदर्भात पूर्णपणे कारवाई आपण करतो आहोत. मी या सभागृहामध्ये उद्या सविस्तर निवेदन करीन. कारण संपूर्ण प्रकरणाची आजही चौकशी चाललेली आहे. हा आपल्या कोणासाठीही राजकारणाचा प्रश्न नाहीये, हा महिलांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. अशाप्रकारे ब्रेनवॉशिंग करून महिलांचा दुरुपयोग करणे, त्यांच्यावर अत्याचार करणे अशा अनेक गोष्टी यामध्ये करण्यात आल्या आहेत.
खरातला अटक होऊ नये म्हणून उच्चपदस्थ आयएएस, आयपीएस अधिकारी बैठका घेत होते : विजय वडेट्टीवार
विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘‘पुरोगामी महाराष्ट्रात धर्माच्या नावाखाली महिलांचे शोषण करणाऱ्या अशोक खरातसारख्या भोंदू बाबांना अभय मिळणे, ही अत्यंत शरमेची बाब आहे. ज्योतिषशास्त्राच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करणाऱ्या या भोंदूचे १०० हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आले आहेत. या विकृत प्रवृत्तीमुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेला तडा जात असून, हे खपवून घेतले जाणार नाही. धक्कादायक म्हणजे, या भोंदूबाबाला अटक होऊ नये म्हणून शासनाचे उच्चपदस्थ आयएएस, आयपीएस आणि महसूल अधिकारी एका हॉटेलमध्ये बैठका घेत होते. जे अधिकारी आणि मंत्री संविधानाची शपथ घेतात, तेच जर अशा भोंदूंच्या पाया पडत असतील, तर सामान्य जनतेने न्याय कोणाकडे मागायचा?’’
केवळ एसआयटी नेमून हे प्रकरण शांत होणार नाही, यात सामील असलेल्या प्रत्येक मंत्र्याचा राजीनामा आणि दोषी अधिकाऱ्यांचे निलंबन झालेच पाहिजे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून अनेक महिलांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे ज्या मंत्र्यांनी आणि संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींनी या भोंदूला प्रतिष्ठा मिळवून दिली, त्या सर्वांचे सीडीआर तपासा आणि त्यांना या गुन्ह्यात सहआरोपी करा अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
कोणालाही सोडले जाणार नाही : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘मी केवळ आपल्याला एवढंच सांगतो की, या संदर्भात कारवाई जरी आता झाली, तरीदेखील याची तयारी आधीपासून सुरू होती. त्यांच्या अटकेच्या अगोदरच म्हणजे १० मार्चला दुसऱ्या जिल्ह्यातून आपण एका तक्रारीचा उपयोग करून त्यांचा एलओसीदेखील काढून ठेवला होता की त्यांना बाहेर पळता येऊ नये.’’
मी नेहमी क्लीन चिट देत नाही, जो क्लीन असतो त्यालाच क्लीन चिट मिळते. अशी कुठलीच चिट माझ्याकडे नाही. याच्यात ज्याचा दुरान्वयानेही संबंध असेल, त्यालाही सोडलं जाणार नाही, असे आश्वासनदेखील मुखयमंत्री फडणवीस यांनी सरकारची भूमिका मांडताना दिले.

