सग्रहीत छायाचित्र
पहलगाममध्ये घडलेल्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानचा जगासमोर उघड केलेला दहशतवादाचा चेहरा हा कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षाही मोठा विजय आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जोरदार कौतुक करत, त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने जागतिक स्तरावर दहशतवादाविरोधात प्रभावी भूमिका बजावल्याचे सांगितले.
"भारताने फक्त आपल्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला नाही, तर जागतिक व्यासपीठावर पाकिस्तानचा खरा चेहरा उघड करून दाखवला आहे. ही लढाई केवळ हत्यांची नाही, ही लढाई सत्याच्या बाजूने उभे राहण्याची आहे. यात भारत यशस्वी झाला आहे," असे शिंदे म्हणाले.
या हल्ल्यानंतर भारत सरकारने तात्काळ पावले उचलून जागतिक समुदायाचे लक्ष पाकिस्तानच्या भूमीवर वाढत्या दहशतवादी कारवायांकडे वेधले. त्यातून जागतिक स्तरावर पाकिस्तानवर दबाव वाढत असून भारताची दहशतवादाविरोधातील भूमिका अधिक बळकट झाली आहे.
शिंदे यांनी असेही सांगितले की, "पंतप्रधान मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे आणि ठाम निर्णयक्षमतेमुळे, भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादविरोधातील लढ्यात महत्त्वाची आघाडी घेतली आहे. हा खरा विजय आहे — देशाच्या सुरक्षेचा, आत्मसन्मानाचा आणि जागतिक प्रभावाचा." दरम्यान, पहलगाममधील हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली असून नागरिकांमध्ये राष्ट्रीय सुरक्षेबाबत अधिक सजगता निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.