सग्रहीत छायाचित्र
मुंबई – राज्यात हिंदी विरुद्ध मराठी भाषा वाद पुन्हा एकदा चिघळला असून त्यात आता 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचे वीर आणि माजी मरीन कमांडो प्रवीण कुमार तेवतिया यांनी थेट सहभाग घेतला आहे. त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना उद्देशून थेट सवाल करत भाषेच्या राजकारणावर कडवट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
काय म्हणाले तेवतिया?
“मी 26/11 च्या हल्ल्यात मुंबई वाचवली. मी उत्तर प्रदेशचा आहे आणि मी महाराष्ट्रासाठी रक्त सांडले आहे. मी ताज हॉटेल वाचवले. त्यावेळी राज ठाकरेंचे हे तथाकथित योद्धे कुठे होते? देशाचे विभाजन करू नका. हास्याला भाषा नसते,” असे एक्स मरीन कमांडो प्रवीण कुमार तेवतिया यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. या पोस्टसोबत त्यांनी वर्दीतील एक फोटोही पोस्ट केला आहे. त्यांच्या बुलेटप्रूफ जॅकेटवर UP असे लिहिलेले आहे आणि गळ्यात बंदूक दिसत आहे. तसेच तेवतिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषा वादासंदर्भातील एका व्हिडिओवर प्रतिक्रिया देते असल्याची पोस्टही केली आहे.
प्रवीण कुमार तेवतिया हे माजी कमांडो (MARCOS) आहेत. त्यांनी मुंबईतील ताज हॉटेलवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान, दहशतवादविरोधी कारवाईत आपल्या पथकाचे नेतृत्व केले होते. या कारवाईदरम्यान त्यांना अनेक जखमा झाल्या होत्या. त्यांना चार गोळ्याही लागल्या होत्या. त्यांच्या जलद कारवाईने१५० हून अधिक लोकांचा जीव वाचला.