ST Bus Employee: एसटी कर्मचाऱ्यांना जूनपासून ५३ टक्के महागाई भत्ता

राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Dhanshri Otari
  • Tue, 3 Jun 2025
  • 07:00 pm
ST Bus Employee, good news for st bus employees ,  eknath shinde

राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. मुळ वेतनावर जून २०२५ पासून ४६ टक्के ऐवजी ५३ टक्के महागाई भत्ता अदा करण्यात येणार आहे. यासोबतच, महामंडळातील कर्मचाऱ्यांना महात्मा फुले जनआरोग्य योजना किंवा धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना यापैकी एक निवडण्याचा पर्याय, एक कोटी रुपयांचे अपघाती विमा कवच लागू करण्याचा तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास पास नऊ ऐवजी १२ महिन्यासाठी देण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे एसटी कामगार वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

सह्याद्री अतिथीगृह येथे एसटी महामंडळाच्या विविध संघटनांच्या प्रतिनीधींची आज बैठक पार पडली. यावेळी बोलताना शिंदे यांनी या निर्णयांसंदर्भात माहिती दिली आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांना जूनपासून ५३ टक्के महागाई भत्ता

 महामंडळातील कर्मचाऱ्यांना मुळ वेतनावर ४६ टक्के महागाई भत्ता अदा करण्यात येत आहे. परंतु आता जून २०२५ च्या वेतनापासून मूळ वेतनावर ५३ टक्के महागाई भत्ता अदा करण्यात येणार आहे. महागाई भत्त्याच्या थकबाकीबाबत निधीची उपलब्धता पाहून निर्णय घेण्यात येईल असेही यावेळी शिंदे यांनी स्पष्ट केलं. 

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना पाच लाखापर्यंत कॅशलेस वैद्यकीय लाभ उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याचबरोबर "धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना देखील सुरू करण्यात आली आहे. या दोन्ही पैकी एक योजना निवडण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. अशी माहितीदेखील त्यांनी यावेळी दिली. 

तसेच, सामान्यांसाठी जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या बससेवेच्या माध्यमातून लोकांना अपेक्षित अशी चांगली सेवा मिळाली पाहिजे. बसगाड्यासोबतच बसस्थानके देखील स्वच्छ असली पाहिजे. स्वच्छतागृह, विश्राम कक्ष यांच्या स्वच्छतेसाठी प्राधान्य दिले पाहिजे. एसटीच्या माध्यमातून कार्गो सेवा सुरू करण्यावर भर देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले. बसस्थानके हे बस पोर्ट झाली पाहिजे असे सांगत एसटी तोट्यातून वर कशी काढता येईल याचा अभ्यास करा. एसटीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे यासंदर्भात प्रयत्न करण्याच्या सूचना शिंदेंनी कर्मचाऱ्यांना केल्या असल्याचे त्यांनी सांगितले. 

Share this story

Latest