Former MLA Rajan Salvi
ठाकरे गटात नाराज असलेले माजी आमदार राजन साळवी यांनी अखेर ठाकरे गटाला राम राम ठोकत उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत साळवी धनुष्यबाण उचलणार आहेत. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, साळवी यांच्या पक्षप्रवेशासंदर्भात मुंबईत आज रात्री पक्षाची बैठक बोलावली आहे. उद्या दुपारी 3 वाजण्याच्या सुमरास साळवी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
साळवी यांचा राजीनामा उद्धव ठाकरे यांच्यासाठी धक्का मानला जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यात साळवी अनेक वर्षे आमदार म्हणून शिवसेनेचे प्रतिनिधित्व केले आहे. कोकणातील लांजा, राजापूर आणि साखरपा परिसरात राजन साळवी यांचे वर्चस्व आहे. राजन साळवी हे मातोश्रीचे निष्ठावंत म्हणून ओळखले जात होते. मात्र, काही दिवसांपूर्वी, विनायक राऊत यांच्याशी झालेल्या वादात उद्धव ठाकरे यांनी राऊतांची बाजू उचलून धरल्यामुळे साळवी दुखावले गेले.
काही दिवसांपूर्वी साळवी भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली होती. इतकेच काय तर साळवींचा हा निर्णय पक्का झाला होता. पक्षप्रवेशासंदर्भात भाजपनेत्यांसोबत चर्चादेखील त्यांची झाली होती. मात्र, साळवी यांना वेटिंगवर ठेवल्याची माहिती सुत्रांकडून मिळालीय.