- शेतकऱ्यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक, योजना रद्दची केली मागणी
पुणे : पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) वाघोली येथील टाऊन प्लॅनिंग (टीपी) स्कीमला शेतकऱ्यांचा विरोध सुरू झाला आहे. सध्या ही योजना प्राथमिक टप्प्यात असून, शुक्रवारी (दि. १२ सप्टेंबर) पीएमआरडीए कार्यालयात शेतकऱ्यांची अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत योजना रद्द करण्याची मागणी केली.
बैठकीत प्रशासनाकडून शेतकऱ्यांना टीपी स्कीमविषयी माहिती देण्यात आली. या योजनेमुळे परिसरातील रस्त्यांचे जाळे सुधारेल, रिंगरोडसाठी मदत होईल, तसेच वाहतूक कोंडीपासून काही प्रमाणात सुटका मिळेल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. शहराच्या वाढत्या विस्ताराला आणि वाहतुकीच्या वाढत्या समस्येला तोंड देण्यासाठी टीपी स्कीम उपयुक्त ठरेल, असे सांगण्यात आले. मात्र शेतकऱ्यांनी यावर आक्षेप घेत, शेतीची जमीन जाऊन उपजीविकेचा प्रश्न उपस्थित केला. तसेच मोबदला मिळण्याबाबत अनेकांमध्ये संभ्रम होता. संभाव्य अडचणी टाळण्यासाठी ही योजना रद्द करावी, अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली.
शेतकऱ्यांच्या या मागणीवर प्रशासनानेही त्यांची बाजू समजून घेण्याची भूमिका घेतली. शेतकऱ्यांच्या सूचनांनुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. त्यामुळे पुढील काही दिवसांत या योजनेबाबतचे निर्णय महत्वाचे ठरणार आहेत. वाघोली परिसरात वेगाने शहरीकरण होत असताना, विकासकामे आणि शेतकऱ्यांचे हक्क यामध्ये समतोल कसा साधला जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
“वाघोली येथील शेतकऱ्यांना टीपी योजनेची माहिती देण्यासाठी बोलावले होते. त्यांना योजनेचे फायदे समजावून सांगितले. मात्र ही योजना रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी घेतली. त्यांची भूमिका समजावून घेतली आहे. सध्या ही योजना प्राथमिक टप्प्यात आहे. प्रशासन पुढील कार्यवाही करेल.” – अविनाश पाटील, संचालक, विकास-परवानगी व नियोजन विभाग, पीएमआरडीए.


