संग्रहित छायाचित्र
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप होत असताना धनंजय मुंडे यांचा पाय अजूनच खोलात जाण्याची चिन्हे आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर पावणेतीनशे कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.
नॅनो युरिया, नॅनो डीएपी, बॅटरी स्पेअर, मेटाल्डे हाइड आणि कापूस गोळा करण्यासाठीच्या बॅगा यांच्या खरेदीमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे.
या उत्पादनांची मूळ ऑनलाईन किंमत दाखवून ही उत्पादने वाढीव पैसे देवून मुंडे यांनी खरेदी केल्याचा आरोप आहे. तसेच ही उत्पादने इफको नावाच्या कंपनीचे असल्याचं दमानिया यांनी म्हटलं आहे.
पाच वस्तूंच्या खरेदीमध्ये घोटाळा
ऑनलाइन किंमतीनुसार १८४ रुपये प्रती लीटर नॅनो युरियाची बॉटल मिळते. म्हणजे ५०० मिलिलीटरच्या बॉटलला ९२ रुपये पडतात. मात्र कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जे टेंडर काढलं गेलं, त्यामध्ये तब्बल २२० रुपयांना ही बॉटल खरेदी केली गेली. १९ लाख ६८ हजार ४०८ इतक्या बॉटल्स खरेदी केल्या. म्हणजे दुपटीपेक्षा जास्त दराने त्यांनी या बॉटल्स खरेदी केल्या.
नॅनो डीएपीच्या एक लीटरच्या एका बॉटलची किंमत ५२२ रुपये इतकी आहे. तर ५०० मिलिलीटरच्या बॉटलला २६९ रुपये पडतात. कृषि विभागायने १९ लाख ५७ हजार ४३८ बॉटल्स खरेदी केल्या. २६९ रुपयांची बॉटलची कृषिमंत्र्यांनी ५९० रुपयांना खरेदी केली.
बॅटरी स्पेअर हा टु इन वन आहे. एमएआयडीच्या वेबसाईटवर हा स्पेअर मिळतो. तो २४५० रुपयाला मिळतो. एमएआयडीच्या वेबसाईटवर २९४६ रुपयाला विकला जातो. कृषी मंत्र्यांनी टेंडर काढून ३४२६ रुपयाला ही बॅटरी विकत घेतली. एक हजाराच्या वर एक एक बॅटरी स्पेअर कमावले.
गोगलगायीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मेटाल्डे हाइड हे पीआयए कंपनीचं पेटेंटेड उत्पादन आहे. हे उत्पादन बल्कमध्ये घेतल्यावर स्वस्त मिळतं. रिटेलमध्ये आता या उत्पादनाची किंमत ८१७ रुपये आहे. पण कृषी मंत्री मुंडेंनी १२७५ रुपयाला विकत घेतलं. असं एकूण १ लाख ९६ हजार ४४१ किलो विकत घेतलं.
तब्बल ६ लाख १८ हजार कॉटन स्टोरेज बॅग खरेदी केल्या गेल्या. काही दिवसापूर्वी नागपूरच्या आयसीएआर नावाच्या संघटनेने ५७७ रुपयाला २० बॅगा घेतल्या. पण मुंडेंनी टेंडरमधून १२५० रुपयाला घेतल्या. ३४२ कोटीच्या टेंडरमध्ये १६० कोटी रुपये सरळ सरळ गेले.
केवळ एकच वर्ष पदावर राहून या व्यक्तीने अफाट पैसा खाल्ला असेल तर त्यांना मंत्रीपदावर ठेवण्याची गरज आहे का? असा सवाल अंजली दमानिया यांनी केला.