संग्रहित छायाचित्र
परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणात मला अडकवण्यासाठी धनंजय मुंडे यांनी पोलिसांवर दबाव आणल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राजेभाऊ फड यांनी केला.
दोन दिवसांपूर्वीच भाजपा आमदार सुरेश धस यांनी परळीतील महादेव मुंडे खून प्रकरण प्रकाशझोतात आणलं होतं. परळीमध्ये वर्षभरापूर्वी महादेव मुंडे यांचा खून झाला होता. या प्रकरणातील आरोपी अजूनही पोलिसांना सापडले नाहीत. तसेच जे आरोपी आहेत ते वाल्मीक कराडच्या मुलाचे बॉडीगार्ड असल्याचा आरोप धस यांनी केला होता. त्यानंतर राजेभाऊ फड यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले.
राजेभाऊ फड म्हणाले की, परळी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी प्रयत्न केले गेले. मी शरद पवारांच्या पक्षाकडून निवडणूक लढवू नये. तसेच आपल्याविरोधात कुणी निवडणूक लढवू नये. आपल्याला विरोधक तयार होवू नये. असं धनंजय मुंडे यांना वाटतं. तसेच समाजातूनदेखील दुसरं नेतृत्व पुढे येता कामा नये यासाठी ते पोलीस यंत्रणेवर दबाव टाकून खोटे गुन्हे दाखल करतात, असा आरोप फड यांनी केला.
तत्कालीन पोलीस निरीक्षक सानप हे चांगले अधिकारी होते. त्यांनी महादेव मुंडे खून प्रकरणात योग्य तपास केला होता. परंतु त्यांच्यावर दबाव टाकून दुसऱ्याच आरोपींना खुनाच्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यांनी बदली करुन घेतली, असं देखील राजेभाऊ फड म्हणाले.
तसेच, धनंजय मुंडे यांनी आता नैतिकतेच्या आधारावर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. मी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतो, असे राजेभाऊ फड म्हणाले.