मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड दौऱ्यावर आहेत. पण दुसरीकडे अडचणीत आलेले मंत्री धनंजय मुंडे गैरहजर राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. दरम्यान गैरहजर राहण्यामागचे मोठं कारण समोर आलं आहे.
मस्साजोग प्रकरणावरून धनंजय मुंडेंवर होणाऱ्या आरोपांमध्ये अंजली दमानिया यांनी मंगळवारी धनंजय मुंडे यांच्यावर कृषिमंत्री असताना घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केलेत. अशातच आज फडणवीस बीड दौऱ्यावर आहेत. त्यामुळं फडणवीस या दौऱ्यादरम्यान मुंडेंवरील आरोपांवर काय प्रतिक्रिया देतील हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
बीडच्या आष्टीत काही विकासकामांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड दौऱ्यावर आहेत. यावेळी आयोजित सरकारी कार्यक्रमाला धनंजय मुंडे उपस्थिती राहणार नसल्याची माहिती मिळाली आहे.
गैरहजेरीचे मोठं कारण?
मिळालेल्या माहितीनुसार, मुंडे यांच्या डोळ्यांचे ऑपरेशन आज असल्यामुळे ते या ठिकाणी उपस्थित राहणार नाहीत. मुंडे यांच्या डोळ्यावर मोतीबिंदूची शस्त्रक्रियाी करण्यात येणार आहे. त्यानंतर 8 दिवस घरीच असतील. सध्या धनंजय मुंडे सातपुडा या सरकारी निवासस्थानी आहेत.
राजीनाम्याच्या चर्चेत तब्बल 88 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप
महायुती सरकारच्या गेल्या टर्ममध्ये धनंजय मुंडे हे कृषीमंत्री असताना त्यांच्या विभागात तब्बल 88 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंगळवारी केला. अंजली दमानिया यांचे आरोप धादांत खोटे आहेत. आम्ही शांत बसलो आहोत, असे कोणीही समजू नये. आम्हाला बोलता येत नाही किंवा आमच्याकचे काहीच नाही, असा समज कोणीही करुन घेऊ नये, असा इशारा मंत्री धनंजय मुंडे यांनी दिला.