Ajit Pawar : विलंबामुळे प्रकल्पाच्या किंमती वाढतात;नियोजित वेळेत विकासकामे मार्गी लावावी : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे शहरात वाहतुक कोंडीची समस्या गंभीर असून ती सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे. पुणे शहर आणि उपनगरांची वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी पुणे रिंग रोडचे काम वेगाने मार्गी लावा. पुणे शहरात दर वर्षी लाखो नवीन वाहने रस्त्यावर येत आहेत, त्यामुळे शहरातील वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Fri, 14 Feb 2025
  • 08:50 am
pune mirror

संग्रहीत छायाचित्र

मुंबई  :- राज्यातील विकासकामांची गती राखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. विलंबामुळे प्रकल्पांच्या किंमतीत भरमसाठ वाढ होऊन राज्याचे दीर्घकालीन नुकसान होते, ते टाळण्यासाठी नियोजित वेळेत विकास प्रकल्प मार्गी लावण्यावर भर द्यावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. तसेच पुण्यात ‘एम्स’च्या उभारण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी(दि.१३) मंत्रालयात, उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षाची (प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनीटच्या) बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर,  ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंग यांच्यासह पुणे मेट्रो, पीएमआरडीए, संबंधित जिल्ह्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीचे संचालन उपमुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव विकास ढाकणे यांनी केले. 

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पुणे शहरात वाहतुक कोंडीची समस्या गंभीर असून ती सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे. पुणे शहर आणि उपनगरांची वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी पुणे रिंग रोडचे काम वेगाने मार्गी लावा. पुणे शहरात दर वर्षी लाखो नवीन वाहने रस्त्यावर येत आहेत, त्यामुळे शहरातील वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे शहर आणि उपनगरातील वाहतुक सुरळीत करण्यासाठी मेट्रो, उड्डाणपूल, रिंग रोड तसेच सुरु असणाऱ्या सर्व पायाभूत सुविधांच्या कामांचा वेग वाढविण्यात यावा. यासाठी या प्रकल्पांशी संबंधित सर्व विभागाने योग्य समन्वय आणि ताळमेळ राखत पुणेकरांची वाहतुक कोंडीतून सुटका करावी. तसेच पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणाऱ्या ‘कर्जत-भीमाशंकर-खेड-शिरुर’ रस्त्याच्या कामाची व्यवहार्यता तपासून पाहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी लोणावळा येथील नियोजित स्काय वॉक, टायगर पॉईंट, पुणे नाशिक ग्रीन फिल्ड सेमी हायस्पीड रेल्वे, ‘सारथी’संस्थेच्या नाशिक, कोल्हापूर, नागपूर, खारघर, संभाजीनगर, अमरावतीच्या विभागीय उपकेंद्रांचे बांधकाम, सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालय, अलिबागच्या उसर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातारा सैनिक स्कुल, रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग, वडाळा येथील जीएसटी भवन, रेडिओ क्लब मुंबई, रत्नागिरीचे मिरकरवाडा बंदर, वढू व तळापूर येथील स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक, पुणे येथील वीर वस्ताद लहूजी साळवे स्मारक, कृषीभवन, कामगार कल्याण भवन, सहकार भवन आदी प्रकल्पांच्या प्रगतीचा देखील आढावा घेतला.

Share this story

Latest