Eknath Shinde
राजकीय गोटात एकिकडे उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नाराजीची चर्चा सुरु असतानाच मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री यांच्यात वादाचा दुसरा अंक सुरु होणार असल्याचे बोललं जात आहे.
राज्यातील प्रमुख प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वॉररुममधून आढावा घेतला जातो. मात्र, आता एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाच्या खात्यांच्या अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र को-ऑर्डिनेशन रुम स्थापन केली आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदेंचा फडणवीसांना शह देण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगण्यात येत आहे.
कनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे नगरविकास, म्हाडा, एमएसआरडीसी, एसआरए, गृहनिर्माण अशी महत्त्वाची खाती आहेत. या खात्यांच्या सर्व प्रकल्पांचा एकनाथ शिंदे यांच्या को-ऑर्डिनेशन रुममधून आढावा घेतला जाईल.
एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्याची सूत्रे असताना मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून अनेक गरजू आणि गरीब रुग्णांना आर्थिक मदत करण्यात आली होती. मात्र, मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर त्यांच्या हातून अनेक गोष्टी वाळूसारख्या निसटल्या. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री सहायता निधी कक्षाची स्थापना केली आहे. या कक्षाच्या प्रमुखपदी पुन्हा एकदा मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे माजी प्रमुख मंगेश चिवटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली राज्यात महायुतीचं सत्ता स्थापन झाल्यापासून शिंदे आणि फडणवीस यांच्या कोल्ड वॉर सुरु असल्याची चर्चा सातत्याने ऐकायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये शिंदे यांनी फडणवीस यांनी आयोजित केलेल्या बहुतांश बैठकीला गैरहजेरी लावली आहे. अशातच पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाल्यानंतर एकनाथ शिंदे नाराज होऊन गावी गेले होते. त्यामुळं रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली.