सग्रहीत छायाचित्र
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी काल (दि. २०) मंत्रिपदाची शपथ घेतली असून, त्यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा विभागाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर भुजबळ यांची वर्णी लागली आहे.
वारंवार भुजबळांना संधी, पक्षात नाराजी
छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा मंत्रिपद देण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजीचे वारे वाहू लागले आहेत. काल झालेल्या पक्ष बैठकीस काही आमदारांनी जाणूनबुजून दांडी मारल्याचे सूत्रांकडून समजते. वारंवार त्याच नेत्यांना संधी दिली जात असल्याने पक्षातील काही नेते नाराजी व्यक्त करत आहेत. विशेषतः फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातून वगळण्यात आलेले काही माजी मंत्री आणि नव्याने संधीची अपेक्षा ठेवणारे आमदार नाराज असल्याचे बोलले जात आहे.
अनिल पाटील यांची संधी हुकली?
अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांचे नाव या रिक्त मंत्रिपदासाठी आघाडीवर असल्याचे चर्चेत होते. मागील शिंदे सरकारमध्ये त्यांनी मंत्रीपद सांभाळले होते. यावेळीही त्यांना संधी मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. अगदी मंत्री नरहरी झिरवाळ यांनीही काही दिवसांपूर्वी मुक्ताईनगर दौऱ्यात अनिल पाटील यांच्या नावाचा उल्लेख करत संभाव्य मंत्रिपदाचे संकेत दिले होते. मात्र प्रत्यक्षात भुजबळांची निवड झाल्याने अनिल पाटील यांची संधी हुकली आहे.
अजित पवार-भुजबळ समीकरण पुन्हा बळकट?
धनंजय मुंडे यांचा राजीनामा आणि त्यानंतर भुजबळ यांना दिले गेलेले मंत्रिपद, यामागे अजित पवार व छगन भुजबळ यांच्यातील संबंध पुन्हा सुधारल्याचे संकेत काही राजकीय विश्लेषक देत आहेत. याआधी दोघांमध्ये थोडासा दुरावा निर्माण झाल्याचे बोलले जात होते. मात्र, या नव्या मंत्रिपदामुळे हे समीकरण अधिक मजबूत झाल्याचे संकेत मिळत आहेत.