India-Russia | रशियन संसद ड्युमाचे अध्यक्ष वोलोदीन यांनी घेतली राज्यपालांची भेट, 'या' महत्वाच्या विषयावर झाली चर्चा....

रशियन संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचे (डयूमा) अध्यक्ष व्याचेस्लाव वोलोदिन यांच्या नेतृत्वाखालील भारत दौऱ्यावर आलेल्या रशियाच्या संसदीय शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Swapnil Hajare
  • Wed, 5 Feb 2025
  • 08:06 am
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

व्याचेस्लाव वोलोदिन (रशिया) आणि सी.पी.राधाकृष्णन (राज्यपाल,महाराष्ट्र)

मुंबई : रशियन संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचे (डयूमा) अध्यक्ष व्याचेस्लाव वोलोदिन यांच्या नेतृत्वाखालील भारत दौऱ्यावर आलेल्या रशियाच्या संसदीय शिष्टमंडळाने मंगळवारी (दि. ०४) महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज्य विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर हे देखील उपस्थित होते.

सशक्त राष्ट्र निर्माण होण्यासाठी राज्ये सशक्त होणे आवश्यक आहे असे सांगून संसदीय सहकार्य राज्यस्तरावर व विभाग स्तरावर देखील वाढावे या दृष्टीने ही भेट असल्याचे रशियन संसदेच्या अध्यक्षांनी यावेळी सांगितले. रशियात ८९ प्रांत आहेत. प्रत्येक प्रांतात विधानसभा व स्थानिक सरकारे आहेत.  भारतात देखील राज्ये व विधानमंडळे आहेत. या स्तरावर संसदीय संबंध वाढवून परस्परांच्या चांगल्या संसदीय प्रथा परस्परांना अंगीकारता येतील असे वोलोदिन यांनी सांगितले.

आपल्या भेटीत आपण विधानमंडळ, उद्योग व्यापार प्रतिनिधी यांसह मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना भेटत असल्याचे सांगून वोलोदिन यांनी मुंबई विद्यापीठात १९६४ पासून रशियन भाषा विभाग कार्यरत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. रशिया आंतरराष्ट्रीयस्तरावर अनेक आव्हानांना तोंड देत असताना भारत देत असलेल्या पाठिंब्याबद्दल वोलोदिन यांनी भारताप्रती कृतज्ञता व्यक्त केली. विविध आव्हानांना सामोरे जात आपल्या देशाने सातत्याने प्रगती केली आहे, असे सांगून भारत रशिया व्यापार सध्याच्या ५७ अब्ज डॉलरवरून २०३० पर्यंत १०० अब्ज डॉलर इतका होईल असा विश्वास वोलोदिन यांनी व्यक्त केला.

रशिया नेहमी भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे असे सांगून भारत-रशिया संबंध नेहमी बहीण भावाप्रमाणे बळकट असल्याचे राज्यपालांनी सांगितले. उभय देशांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान यांसह ब्रिक्स व्यासपीठावर देखील सहकार्य वाढत आहे. उभय देशांमधील विद्यापीठांमध्ये सहकार्य वाढल्यास युवा पिढी परस्परांजवळ येईल, असे राज्यपालांनी सांगितले. मुंबईजवळील वाढवण बंदर पूर्ण झाल्यावर भारत इराण रशिया व्यापार वाढेल, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला. यावेळी वोलोदिन यांनी राज्यपाल राधाकृष्णन तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांना रशिया भेटीवर येण्याचे निमंत्रण दिले.

Share this story

Latest