मराठी कधीही बोलणार नाही, अशी भूमिका घेऊन वाद निर्माण करणाऱ्या व्यावसायिक सुशील केडिया यांनी अखेर माफी मागितली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी आज केडिया यांचे ऑफिस फोडल्यानंतर सुशील केडिया यांनी एक्सवर पोस्ट करत माफी मागितली. त्यांनी राज ठाकरे यांना टॅग करत इंग्रजीमधून प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले केडिया?
मी माझ्या चुकीबद्दल माफी मागतो. राज ठाकरे यांच्याबद्दल मला नेहमीच आदर, कृतज्ञता वाटत आली आहे. मी माझी चूक मी स्विकारतो. तसेच मी आता अपेक्षा करतो की, वातावरण शांत रहावे. मी त्यांचा आभारी आहे. असे केडिया यांनी म्हटले आहे.
तसेच, मी केलेले ट्विट चुकीच्या मानसिक अवस्थेत आणि तणावाखाली लिहिले होते. पण माझ्या त्या ट्विटचा अर्थ चुकीचा लावण्यात आला. काही लोकांनी वाद निर्माण करत त्यामधून फायदा मिळवण्याचा प्रयत्न केला. पण मराठी न कळणाऱ्या काही जणांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर मी मानसिक तणावाखाली होते. पण मला आता जाणवत आहे की, माझी प्रतिक्रिया मागे घ्यायला हवी. असही केडिया यांनी म्हटले आहे.
सुशील केडिया नेमकं काय म्हणाले होते?
"राज ठाकरे याची नोंद घ्या की, मागील 30 वर्षांपासून मुंबईत राहत असूनही मला मराठी नीट येत नाही. आता तुमच्या अती गैरवर्तनामुळे मी निश्चित केलं आहे की, जोपर्यंत तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचे नाटक करण्याची परवानगी मिळत आहे तोपर्यंत मराठी शिकणार नाही अशी मी प्रतिज्ञा करतो. काय करायचं आहे बोल?".