Budget 2025 : महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात २३ हजार ७७८ कोटींची तरतूद - रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

यापूर्वी २००९-१४ या काळात महाराष्ट्राला वर्षाला सरासरी १ हजार १८१ कोटी रुपये मिळायचे. यंदा एकाच वर्षातील तरतूद ही तब्बल २० पटींनी अधिक आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Swapnil Hajare
  • Tue, 4 Feb 2025
  • 06:43 am
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव....

मुंबई - महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी २०२५-२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात यंदा २३ हजार ७७८ कोटी रुपयांची विक्रमी तरतूद करण्यात आली आहे. अशी माहिती महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय वाटपाबाबत (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे) माध्यमांशी बोलताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. यापूर्वी २००९-१४ या काळात महाराष्ट्राला वर्षाला सरासरी १ हजार १८१ कोटी रुपये मिळायचे. यंदा एकाच वर्षातील तरतूद ही तब्बल २० पटींनी अधिक आहे. 

पुढे मंत्री वैष्णव म्हणाले की, महाराष्ट्र या वळणावर पुढे आहे कारण रेल्वे, राज्य सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांच्यात त्रिपक्षीय करार आहे, ज्या अंतर्गत सर्व प्रकल्पांसाठी राज्य सरकारचा निधी वाटा आरबीआयकडून दिला जाऊन प्रकल्पांची अंमलबजावणी जलद होईल.

महाराष्ट्रात, अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत १३२ स्थानकांवर पुनर्विकासाचे काम जलद गतीने सुरू आहे. महाराष्ट्रात सध्या १,७०,००० कोटी रुपयांचे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत, त्यापैकी १७,१०७ कोटी रुपयांचे ३०१ किमी लांबीचे प्रकल्प मुंबईत राबविले जात आहेत. या प्रकल्पांमध्ये : 

* छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कुर्ला पाचवी आणि सहावी मार्गिका 

* पॅनेल-कर्जत डबल लाईन उपनगरीय कॉरिडॉर

* ऐरोली-कळवा एलिव्हेटेड कॉरिडॉर

* कल्याण-आसनगाव चौथी मार्गिका 

* कल्याण-कसारा तिसरी मार्गिका 

* कल्याण-बदलापूर तिसरी आणि चौथी मार्गिका

* निळजे-कोपर डबल कॉर्ड मार्गिका समाविष्ट आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, परळ, लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण आणि पनवेल टर्मिनसची क्षमता वाढवली जाईल. विविध रेल्वे अ‍ॅप्स एकत्रित करून एक सुपर अ‍ॅप विकसित केले आहे आणि त्याचे बीटा व्हर्जन गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध आहे.

या आर्थिक वर्षात ५० नमो भारत ट्रेन, १०० अमृत भारत ट्रेन आणि २०० वंदे भारत ट्रेन तयार केल्या जातील. सुरक्षा वाढवण्यासाठी १,१६,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हाय स्पीड रेल्वेबाबत, रेल्वे मंत्री म्हणाले की, "३४० किमी ट्रॅक आधीच पूर्ण झाला आहे आणि बीकेसी, इतर स्थानके आणि समुद्राखालील बोगद्याचे काम वेगाने सुरू आहे. रेल्वेमंत्र्यांनी भारतीय रेल्वेमध्ये कवच ४.० किती वेगाने राबविले जात आहे याची देखील माहिती दिली.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्म वीर मीना यांनी नंतर सांगितले की, "मध्य रेल्वेचे सर्व ब्रॉडगेज ट्रॅक कवच सह सुसज्ज असतील." यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे अवनीश कुमार पांडे (मुख्य प्रशासकीय अधिकारी (निर्माण), मध्य रेल्वे),  अरविंद मालखेडे (प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे) आणि हिरेश मीना (विभागीय रेल्वे व्यवस्थापक,  मुंबई विभाग) हे  उपस्थित होते.

Share this story

Latest