मनासारख्या ठिकाणी पोस्टिंग मिळावी, यासाठी अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांनी भोंदूसोबत संपर्क साधल्याचा दावा
मुंबई : राज्यातील दोन उच्चपदस्थ महिला पोलीस अधिकारी भोंदू अशोक खरातच्या संपर्कात असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. या अधिकारी अतिरिक्त पोलीस आयुक्त (एसीपी) आणि उपायुक्त दर्जाच्या (डीसीपी) आहेत. मनासारख्या ठिकाणी पोस्टिंग व्हावी, यासाठी त्या खरातच्या संपर्कात आल्या होत्या, असा दावा करण्यात येत आहे.
भोंदू अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांमुळे अवघ्या राज्यात संतापाची लाट उसळली आहे. खरातवर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आतापर्यंत त्याच्यावर १३ गुन्हे दाखल झाले. यातील ८ गुन्हे लैंगिक शोषणाचे, ४ गुन्हे आर्थिक फसवणुकीचे, तर एक गुन्हा ईडीने दाखल केलेला मनी लाँड्रिंगचा आहे. त्यातच आता त्याला नाशिकमध्ये कार्यरत असणाऱ्या दोन महिला पोलीस अधिकाऱ्यांनी मोठी मदत केल्याची बाब समोर आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या दोन महिला पोलीस अधिकारी अशोक खरातच्या संपर्कात होत्या. यापैकी एक महिला अधिकारी डीसीपी, तर दुसरी एसीपी दर्जाची होती. या दोघी आपल्याला पसंतीची पोस्टिंग मिळावी यासाठी अशोक खरातच्या संपर्कात आल्या होत्या. आता त्यांनी भोंदू खरातशी काही आर्थिक व्यवहार केले होते का, याचा पोलीस तपास करीत आहेत.
या प्रकरणाचा तपास करणारे विशेष तपास पथक अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन आणि मुलीची चौकशी करणार आहे. खरातचा मुलगा दोन दिवसांपूर्वी संपर्काबाहेर असल्याची बाब समोर आली होती. पण आता तो पोलिसांच्या संपर्कात आला आहे. त्यामुळे त्याला आज पुन्हा त्याची त्याच्या बहिणीसह चौकशी होणार आहे. या दोघांची आई कल्पना मात्र अजून फरार आहे.
नियमबाह्य मदत केल्याचा आरोप
नाशिकमध्ये एकेकाळी बड्या पदावर कार्यरत असलेल्या या महिला अधिकाऱ्याने अशोक खरात याला नियमबाह्य मदत केल्याचा आणि दोघांमध्ये पैशांचा व्यवहार झाल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे ही महिला अधिकारी आता पोलिसांच्या रडारवर आली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, सदर महिला अधिकाऱ्याने नाशिकमध्ये कार्यरत असताना अनेक प्रशासकीय कामांत अशोक खरातला नियमबाह्य मदत केली होती. या मदतीच्या बदल्यात खरातने आपले राजकीय लागेबांधे आणि नेटवर्क वापरून या महिला अधिकाऱ्याला हवी असलेली पोस्टिंग मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती.
मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाणघेवाणही, लवकरच चौकशी
आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे केवळ बदलीपुरते मर्यादित नाही, तर या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाणघेवाण झाल्याचेही तपासात समोर आल्याची माहिती आहे. त्यामुळे भोंदू खरातच्या काळ्या साम्राज्याला या अधिकाऱ्याचे संरक्षण लाभले होते का? या दिशेने एसआयटी आता तपास करत आहे. त्यामुळे या अधिकाऱ्याची लवकरच चौकशी होण्याची शक्यता आहे. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे हा संशयाचा वेढा अधिक घट्ट झाला असून, लवकरच या प्रकरणात मोठे मासे गळाला लागण्याची चिन्हे आहेत.
खरातने दिली लैंगिक शोषणाची कबुली
अशोक खरातने महिलांचे लैंगिक शोषण केल्याची कबुली दिली आहे. त्याने महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी वापरलेल्या ट्रिकला विज्ञानाचे नाव दिले आहे. त्याच्या मते, त्याने चमत्कार आणि वशीकरण नव्हे तर हातचलाखीने महिलांना धमकावून त्यांचे शोषण केले. ज्या गोष्टींना लोक चमत्कार व वशीकरण समजतात, मुळात ती हातचलाखी आहे. दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए, असे तो या प्रकरणी म्हणाल्याचे कळते.
एसआयटी चौकशीची शक्यता
या दोन उच्चपदस्थ महिला पोलीस अधिकाऱ्यांची एसआयटी नेमून चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणात राजकीय नेत्यांसह उच्चपदस्थ सनदी अधिकाऱ्यांची नावे आल्यामुळे या प्रकरणाची देशभरात चर्चा होत आहे.,


