Ashadhi Ekadashi 2025 | ‘पर्यावरण वारी’तून विठ्ठल भक्तांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश गावोगावी घेऊन जावा- मुख्यमंत्री फडणवीस

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी' या उपक्रमाचा समारोप

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Swapnil Hajare
  • Sun, 6 Jul 2025
  • 08:19 am
Maharashtra news,Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune,

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी' या उपक्रमाचा समारोप

पंढरपूर : ‘पर्यावरणाची वारी, पंढरपूरच्या दारी’ हा उपक्रम १६ वर्षापासून अत्यंत प्रभावीपणे राबवला जात आहे. या माध्यमातून आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंत पर्यावरण संवर्धनासाठी प्रबोधन केले जात आहे. आपल्या सर्व संतांनी पर्यावरणाची पूजा, रक्षण व संवर्धन करून जग वाचवण्याचा संदेश दिला. हा संदेश अनुसरत सर्व विठ्ठल भक्तांनी वारीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश गावोगावी घेऊन जावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, आणि महाराष्ट्र कला संस्कृती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’  या आळंदी ते पंढरपूर पायी वारीच्या  (दि. 5) समारोप प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

मुख्यमंत्री फडवणीस म्हणाले, वातावरणातील बदलामुळे पर्यावरणाचा ऱ्हास  होत असून जल, वायू व वनराईचे महत्त्व समजून न घेतल्यास जग विनाशाकडे जाईल. त्यामुळे पर्यावरणाच्या जागर हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण असून या माध्यमातून पर्यावरणाचे संवर्धनासाठी जनजागृती केली जात आहे.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली महाराजांनी हिरवी वनराई फुलवण्याचे आवाहन केले तर जगद्गुरु संत तुकाराम यांच्या  ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या अभंगातून निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला. हा संदेश घरोघरी पोहोचवीत आपल्याला वनराई वाढवायची आहे, प्रदूषण कमी करायचे आहे. यासाठी प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संवर्धनातील आपली जबाबदारी ओळखून वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे, अमृता फडणवीस, सोनिया गोरे, आमदार समाधान आवताडे, आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील आदी भजनाचा टाळ वाजवत ठेका धरत ‘ज्ञानोबा तुकाराम’, ‘जय जय राम कृष्ण हरी’ असा गजर करत वारकरी यांच्या समवेत भक्तीरसात दंग होऊन गेले.

यावेळी महाराष्ट्र कला संस्कृती मंचचे ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे, चंदाबाई तिवाडी, शाहीर पृथ्वीराज माळी, सत्यपाल महाराजांचे सप्त खंजिरी भजन, शैलाताई घाडगे यांच्यासह अन्य कलाकारांनी किर्तन, भारुड, पोवाडा यांच्या माध्यमातून टाळ मृदुंगात हरिनामाचा गजर करत पर्यावरणाचे संवर्धन व समतोल राखण्यासाठी जनजागृतीपर कार्यक्रम सादर केले.

Share this story

Latest