संग्रहित छायाचित्र
नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीच्या बाटल्यांच्या खरेदीमध्ये तब्बल ८८ कोटींचा घोटाळा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केल्याचा आरोप सामजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. वर्षभरात धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांचा पैसा खाल्याचा आरोप त्यांनी केला.
दमानिया यांनी कोणते आरोप केले?
ऑनलाइन किंमतीनुसार १८४ रुपये प्रती लीटर नॅनो युरियाची बॉटल मिळते. म्हणजे ५०० मिलिलीटरच्या बॉटलला ९२ रुपये पडतात. मात्र कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जे टेंडर काढलं गेलं, त्यामध्ये तब्बल २२० रुपयांना ही बॉटल खरेदी केली गेली. १९ लाख ६८ हजार ४०८ इतक्या बॉटल्स खरेदी केल्या. म्हणजे दुपटीपेक्षा जास्त दराने त्यांनी या बॉटल्स खरेदी केल्या.
नॅनो डीएपीच्या एक लीटरच्या एका बॉटलची किंमत ५२२ रुपये इतकी आहे. तर ५०० मिलिलीटरच्या बॉटलला २६९ रुपये पडतात. कृषि विभागायने १९ लाख ५७ हजार ४३८ बॉटल्स खरेदी केल्या. २६९ रुपयांची बॉटलची कृषिमंत्र्यांनी ५९० रुपयांना खरेदी केली.
या नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीच्या खरेदीमधील घोटाळा हा ८८ कोटींचा असल्याचा गंभीर आरोप दमानिया यांनी केला. याशिवाय इतर बॅटरी स्पेअर, मेटाल्डे हाइड आणि कापूस गोळा करण्यासाठीच्या बॅगा यांतही कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, ही उत्पादने इफको नावाच्या कंपनीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.