Jalgaon Train Accident : अजित पवारांनी सांगितलं जळगाव रेल्वे अपघाताचं कारण; म्हणाले, एका चहावाल्यानं...

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात परधाडे गावाजवळ २२ जानेवारीला रेल्वे अपघात घडला. पुष्पक एक्स्प्रेस या रेल्वेगाडीमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 23 Jan 2025
  • 10:16 am
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात परधाडे गावाजवळ २२ जानेवारीला रेल्वे अपघात घडला. पुष्पक एक्स्प्रेस या रेल्वेगाडीमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला आणि अनेक प्रवाशांनी घाबरून गाडीतून उड्या मारल्या. दुर्दैवाने, त्याच वेळी समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने प्रवाशांना चिरडले. ज्यामुळे १३ जणांचा मृत्यू झाला आणि अनेकजण गंभीर जखमी झाले.

या अपघातानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, "एका चहा विक्रेत्याने केलेल्या आरडाओरडीमुळे रेल्वेच्या एका डब्यात आग लागल्याची अफवा पसरली. त्यामुळे घाबरलेल्या प्रवाशांनी ट्रेनमधून खाली उड्या मारल्या. ही घटना अफवेमुळे घडली. ही घटना अतिशय दुर्दैवी असून, प्रवाशांमध्ये अफवेमुळे भीतीने गोंधळ निर्माण झाला. आग लागल्याची अफवा पसरल्यानंतर प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी गाडीतून उड्या मारल्या. रेल्वे वेगात असल्यामुळे काही प्रवाशांना गाडीतून उतरणे शक्य झाले नाही. त्यामुळे रेल्वेची साखळी ओढण्यात आली आणि गाडी थांबवण्यात आली. मात्र, त्याच वेळी शेजारच्या ट्रॅकवरून वेगाने येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने रुळांवर असलेल्या प्रवाशांना धडक दिली आणि त्यात अनेक प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला."

या घटनेची माहिती मिळताच मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्य सुरू केले.या दुर्घटनेत आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून, त्यापैकी १० जणांची ओळख पटली आहे. उर्वरित तीन मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नसल्याची माहिती पवार यांनी दिली. 

Share this story

Latest