...तर या दोघांना स्वतःऐवजी भुजबळांची मांडी खाजवावी लागेल; सामनातून एकनाथ शिंदेंना राजीनाम्याचे चॅलेंज

अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी नाराजीनाट्यानंतर मंत्रि‍पदाची शपथ घेतली.पण विरोधकांना महायुतीने घेतलेली ही भूमिका फारशी पचनी पडलेली नाही.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Dhanshri Otari
  • Wed, 21 May 2025
  • 08:55 am
 Chhagan Bhujbal entry into the cabinet, Saamana, challenges Eknath Shinde to resign, devendra fadnavis, NCP , Maharashtra  Cabinet ,Chhagan  Bhujbal, DEVENDRA FADNAVIS, Eknath Shinde

अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी नाराजीनाट्यानंतर मंत्रि‍पदाची शपथ घेतली.पण विरोधकांना महायुतीने घेतलेली ही भूमिका फारशी पचनी पडलेली नाही. भुजबळांच्या शपथविधीसोहळ्यानंतर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अशातच, आज ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजीनामा देण्याचे चॅलेंज देण्यात आले आहे. तसेच अनेक घटनांची आठवण करुन देत संतप्त सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. 

फडणवीस, एकनाथ मिंधे यांचे भुजबळांच्या मांडीशी वैर होते. मंत्रिमंडळात भुजबळांची ‘मांडी’ नको हा त्यांचा पण होता. मात्र आता भुजबळांची मंत्रिमंडळात एण्ट्री झाली आहे. त्यामुळे स्वतःची मांडी खाजविण्याऐवजी यापुढे या दोघांना भुजबळांची मांडी खाजवावी लागेल. असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे. तसेच, बाळासाहेब ठाकरेंवर खरी श्रद्धा असेल तर राजीनामा द्या. असं चॅलेंजदेखील एकनाथ शिंदेंना देण्यात आलं आहे. 

सामना अग्रलेखात नेमकं काय?

उपमुख्यमंत्री मिंधे यांच्या जीवनातला अत्यंत कसोटीचा क्षण आला आहे व त्याबद्दल त्यांनी त्यांचे पक्षप्रमुख अमित शहा यांच्या दारात जाऊन हैदोस घातला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेतले आहे व एकनाथ मिंधे यांना यापुढे भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसावे लागणार आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणाऱ्या छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून बसताना वेदना कशा होत नाहीत? लाज कशी वाटत नाही? वगैरे प्रश्न तेव्हा एकनाथ मिंधे उद्धव ठाकरे यांना विचारत होते. मिंधे वगैरे लोकांनी शिवसेना सोडून अमित शहांचे नेतृत्व स्वीकारले त्यामागे जी कारणे दिली त्यात भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसणे जमणार नाही हे मुख्य कारण होते.

शिवसेनाप्रमुखांना अटक करणाऱ्यांच्या वाऱ्यालाही उभे राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले. आता मिंधे यांची अशी कोंडी अमित शहा व फडणवीस यांनी केली आहे की, शिवसेनाप्रमुखांवर खऱ्या निष्ठा असतील तर राजीनामा द्या, नाहीतर मंत्रिमंडळात भुजबळांच्या मांडीवरचे केस उपटत दिवस ढकला. भुजबळ यांच्या शपथविधी सोहळय़ाला शिंदे-मिंधे यांनी हजेरी तर लावलीच शिवाय शिवसेनाप्रमुखांना अटक करणाऱ्या मांडीचा पुष्पगुच्छ देऊन सत्कारही केला. भुजबळ यांचा मंत्रिमंडळात प्रवेश हा मिंधे व त्यांच्या लोकांना इशारा आहे. भुजबळ यांना मंत्रिमंडळात सुरुवातीला घेतले नव्हते तेव्हा त्यांनी मोठा थयथयाट केला. ओबीसी समाजावर हा अन्याय केल्याचे त्यांचे म्हणणे होते. ‘‘आता मी गप्प बसणार नाही. महाराष्ट्रात रान उठवीन,’’ असा त्यांनी आव आणला. प्रत्यक्षात रान वगैरे उठले नाही व रान उठविण्यासाठी उभे राहिलेले भुजबळ फडणवीस यांच्या सांगण्यावरून शांत बसले.

भुजबळ आणि अजित पवार हे दोघे नेते त्यांच्या ऐतिहासिक मांडय़ांसह फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आहेत व भाजपचे लोक त्यांच्या मांड्यांना ‘देवेंद्ररतन’ तेल चोळून भ्रष्टाचाराचा पाया मजबूत करीत आहेत. एखाद्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, त्याला तुरुंगात पाठवायचे, त्याच्या मांडीला मांडी लावून कधीच बसणार नाही, असे बोंबलायचे. नंतर मात्र सत्तेसाठी त्यांनाच पक्षात घेऊन लोकांना मूर्ख बनवायचे हा भारतीय जनता पक्षाचा धंदा आहे.

अजित पवार, भुजबळांच्या मांड्यांचा फडणवीस व मिंध्यांना इतका तिटकारा आला होता की, मिंधे व फडणवीस हातात गदा घेऊन भुजबळ आणि अजित पवारांच्या मांडय़ा कीचकाप्रमाणे फोडतील असेच वाटत होते. मात्र काळाने या दोघांवर भयंकर सूड घेतला आहे असेच म्हणायला हवे. भुजबळ यांच्यावर ईडीने व किरीट सोमय्यासारख्या भुक्कड लोकांनी आरोप केले. अर्थात किरीट सोमय्याला असे आरोप करून भुजबळांचा छळ करण्याची प्रेरणा फडणवीस वगैरे लोकांचीच होती. आता हाच भुक्कड किरीट सोमय्या भुजबळांच्या मांडीवर थाप मारताना दिसेल. मिंधे गटातील गुलाब पाटील, नांदगावचे कांदे यांनी तर भुजबळांविरुद्ध मोहीमच उघडली होती. भुजबळ हे आसाराम असल्याचे गुलाब पाटील जाहीर सभेतून बोलत होते.

आता मंत्रिमंडळात याच आसारामांच्या पादुकांचे पूजन मिंधे वगैरे लोकांना करावे लागेल. भुजबळ यांनी नाशिकचे पालकमंत्रीपद अनेक वर्षे भूषवले आहे. त्यांचा प्रशासकीय अनुभव दांडगा आहे. फडणवीस त्यांचे सध्याचे पंठमणी आहेत. यापुढे भुजबळ हे अजित पवारांचे नव्हे, तर फडणवीस यांचे आदेश पाळतील व त्यांचे नेते अमित शहाच असतील. ज्या भुजबळांनी एकेकाळी महाराष्ट्राच्या अस्मितेचे लढे लढले, तुरुंगवास सहन केला, मराठी माणसांचे प्रश्न हिरिरीने मांडले, त्यांना जीवनाच्या अखेरच्या टप्प्यात महाराष्ट्र विरोधकांच्या कळपात जाऊन मंत्रीपदाची झूल पांघरावी लागली. ही त्यांची शोकांतिकाच म्हणावी लागेल. 

भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाने फक्त भुजबळांची नव्हे, तर इतर अनेकांची शोकांतिका झाली. फडणवीस, एकनाथ मिंधे यांचे भुजबळांच्या मांडीशी वैर होते. मंत्रिमंडळात भुजबळांची ‘मांडी’ नको हा त्यांचा पण होता. मात्र आता भुजबळांची मंत्रिमंडळात एण्ट्री झाली आहे. त्यामुळे स्वतःची मांडी खाजविण्याऐवजी यापुढे या दोघांना भुजबळांची मांडी खाजवावी लागेल.

Share this story

Latest