Advertisement

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राला हायकोर्टाचा दणका….

  • कौटुंबिक सहलीकरिता फुकेटला जाण्याची नाकारली परवानगी…

मुंबई : आर्थिक फसवणुकीच्या नव्या प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राला तातडीचा दिलासा देण्यास हायकोर्टानं नकार दिलाय. आर्थिक गुन्हे शाखेनं या दोघांविरोधात लूकआऊट नोटीस बजावलीय, त्यामुळे 2 ते 5 ऑक्टोबरदरम्यान कौटुंबिक सहलीनिमित्त फुकेटला जाण्याची परवानगी मागत या दोघांनी हायकोर्टात याचिका दाखल केलीय. मात्र या दोघांविरोधात गंभीर आर्थिक गुन्हे प्रलंबित आहेत, त्यामुळे या याचिकेला राज्य सरकारच्या वतीनं विरोध करण्यात आलाय.

या याचिकेवर आज बुधवारी मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांच्या वतीनं कोर्टाला सांगण्यात आलं की, हे प्रकरण काही वर्षांपूर्वीचं आहे. राज कुंद्रा हे एक हॉटेल व्यावसायिक असून, अनेक ठिकाणी त्यांनी गुंतवणूक केलीय. याशिवाय याप्रकरणी त्यांची मुंबई पोलिसांनी चौकशी केलेली आहे. ते रितसर आलेल्या समन्सनुसार चौकशीला सामोरे गेलेत. मात्र या याचिकेला मुख्य सरकारी वकील मनकुंवर देशमुख यांनी विरोध करीत स्पष्ट केलं की, राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीविरोधात यापूर्वीचे दोन गुन्हेही प्रलंबित आहेत. त्यामुळे त्यांना कोणताही दिलासा देणं योग्य ठरणार नाही, याची नोंद घेत हायकोर्टानं याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार देत ही सुनावणी दोन आठवड्यांकरिता तहकूब केली. पुढील सुनावणीत या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश आर्थिक गुन्हे शाखेला देण्यात आलेत.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी राज कुंद्रा यांची जवळपास पाच तास चौकशी करून त्यांचा रितसर जबाब नोंदवलाय. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं राज कुंद्रा यांना 10 सप्टेंबर रोजी तपास अधिकाऱ्यांसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावलं होतं. मात्र ते काही कारणानं हजर राहू न शकल्यानं त्यांनी आपल्या वकिलामार्फत 15 सप्टेंबरची तारीख मागून घेतली होती. त्यानुसार ते 15 सप्टेंबर रोजी मुंबई पोलीस आयुक्तालयात दाखल झाले होते. मात्र हा तपास अद्याप सुरू असून, याप्रकरणी कुंद्रांना पुन्हा एकदा समन्स बजावलं जाण्याची शक्यता आहे. तसेच राज कुंद्रा यांच्या चौकशीनंतर शिल्पा शेट्टीलादेखील चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि उद्योजक राज कुंद्रासह अन्य एका व्यक्तीविरोधात ऑगस्ट 2025 मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या आरोपींनी एका व्यावसायिकाची तब्बल 60 कोटी रुपयांना फसवणूक केल्याचा आरोप आहे. लोटस कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडडे संचालक दीपक कोठारी यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. दिलेल्या तक्रारीनुसार वर्ष 2015 ते 2023 या काळात झालेल्या आर्थिक व्यवहारात ही फसवणूक झाल्याचा आरोप आहे. शिल्पा शेट्टी तसेच राज कुंद्रा यांनी त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी हे पैसे घेतले होते. याप्रकरणी राज कुंद्रा यांचा प्राथमिक जबाब नोंदवण्यात आलाय. पुढील चौकशीत शिल्पा शेट्टीलाही ईओडब्ल्यूसमोर हजेरी लावावी लागण्याची चिन्हे आहेत.

Keep Up to Date with the Most Important News

By pressing the Subscribe button, you confirm that you have read and are agreeing to our Privacy Policy and Terms of Use
Add a comment Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post

हडपसरमध्ये अनाधिकृत कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा; १५.७६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

चांदी चोरीप्रकरणातील आरोपी यूपीमधून जेरबंद; ४८ लाखांहून अधिक किंमतीचा ऐवज हस्तगत, खडक पोलिसांची कामगिरी