संग्रहित छायाचित्र
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच गरम झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षांचे बडे नेते सभा घेताना दिसत आहेत. दरम्यान, अनेक ठिकाणी बंडखोरी झालेली पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीतही यावरून बिघाडी झाल्याचे चित्र आहे. करमाळा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे दिग्विजय बागल निवडणूक लढवत आहेत. मात्र, तरीही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे. संजय शिंदे यांना करमाळ्यात निवडून द्या, असे अजित पवार म्हणाले. लाल लाल सफरचंद, शिमल्याचे सफरचंद, असेही अजित पवार म्हणाले. कारण संजय शिंदे यांना सफरचंदाचे चिन्ह मिळाले आहे.
मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार यशवंत माने यांच्या प्रचारासाठी अजित पवार आले होते. यावेळी ते बोलत होते. करमाळा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे नारायण पाटील निवडणूक लढवत आहेत, तर महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे दिग्विजय बागल हे निवडणूक लढवत आहेत. तर विद्यमान आमदार संजय शिंदे हे सफरचंदाच्या चिन्हावर अपक्ष निवडणूक लढवत आहेत. अजित पवार यांनी संजय शिंदे यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केल्याने महायुतीत मिठाचा खडा पडला असल्याची चर्चा आहे.
माने यांना पुन्हा निवडून द्या, पुढील काळात ४ हजार कोटी देतो
मोहोळ तालुक्याला 3500 कोटी रुपये दिले आहेत. यशवंत माने यांना पुन्हा निवडून द्या पुढील काळात 4 हजार कोटी देतो, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले. आचारसंहिता जवळ आल्यावर यशवंत माने मला म्हणायचा , दादा निधी द्या. तिकडून राजन पाटील म्हणायचे, दादा देता की नाही, असेही अजित पवार म्हणाले. त्यामुळे ७५० कोटी निधी मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले. २०२९ ला मतदारसंघ फेरनिवड होणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. मी शब्दाचा पक्का आहे. दिलेला शब्द पूर्ण करतो, असे अजित पवार म्हणाले. लाडकी बहीण योजनेवरून अजित पवारांनी मिमिक्री करत विरोधकांची खिल्ली उडवली. ही योजना टिकणार नाही, यांच्याकडे पैसे नाहीत असे विरोधक म्हणत होते. त्यानंतर विरोधक कोर्टात गेले आणि आता ते पण पैसे देऊ, असे सांगत असल्याचे अजित पवार म्हणाले.