landslides : ६१७ गावांना दरडींचा धोका; रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये प्रशासन सतर्क

कोकणातील दरड धोका असलेल्या गावांची संख्या लक्षणीयरीत्या वाढल्याचे भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या (GSI) नव्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने नुकतीच संभाव्य दरडप्रवण गावांची यादी जाहीर केली

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Sunil Chavan
  • Tue, 17 Jun 2025
  • 07:36 am
pune news, pune mirror, civic mirror, pune police, marathi news

संग्रहीत छायाचित्र

कोकणातील दरड धोका असलेल्या गावांची संख्या लक्षणीयरीत्या वाढल्याचे भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या (GSI) नव्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने नुकतीच संभाव्य दरडप्रवण गावांची यादी जाहीर केली असून, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांतील ६१७ गावे आता दरड धोक्याच्या छायेत आली आहेत.

रायगड जिल्ह्यात सर्वाधिक ३९२ गावे दरडप्रवण म्हणून चिन्हांकित करण्यात आली आहेत, तर रत्नागिरीमध्ये १६२ आणि सिंधुदुर्गमध्ये ६३ गावांचा समावेश आहे. याआधी २००५, २०२१ आणि २०२३ मध्ये मोठ्या दरड दुर्घटनांनी कोकण हादरला होता. त्यामुळे यंत्रणांनी यंदा विशेष दक्षता घेत भूवैज्ञानिकांकडून व्यापक फेरसर्वेक्षण करून ही यादी सादर केली आहे.

दरडींचा धोका का वाढतोय?

कोकणातील भौगोलिक रचना पर्वतीय असून, येथे दरवर्षी अतिवृष्टी होते. डोंगराळ भागातील सैल खडकांची रचना, भूकंपप्रवणता आणि डोंगर पोखरून होणाऱ्या विकासकामांमुळे दरडी कोसळण्याचा धोका वाढत आहे. विशेषतः घाटमाथ्यांवरून जाणाऱ्या रस्ते आणि रेल्वे मार्गांवर दरडी कोसळण्याचे प्रमाण जास्त आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर, चिपळूण आणि खेड तालुक्यात सर्वाधिक धोका ओळखण्यात आला आहे. येथील १६२ गावांपैकी १३ गावे ‘जास्त धोकादायक’ तर १४ गावे ‘मध्यम ते जास्त धोकादायक’ श्रेणीत टाकण्यात आली आहेत.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर डोंगर पोखरण्यात आले. परिणामी, अनेक गावांच्या पाठीमागे डोंगर उत्खनन झाल्याने दरडींचा धोका वाढला आहे. इरशाळवाडी आणि तळीयेसारख्या दुर्घटनांमुळे यंत्रणांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर प्रशासन अधिक सतर्क झाले असून, डोंगराळ भागांतील गावांचे सर्वेक्षण करून त्यांचे वर्गीकरण केले जात आहे.

प्रशासनाचे आवाहन आणि उपाययोजना

आपत्ती व्यवस्थापन विभागाने दरडप्रवण गावांना पावसाळ्यात सतर्कतेचा इशारा दिला आहे. संभाव्य धोका असलेल्या गावांमध्ये स्थलांतराच्या तात्पुरत्या तसेच कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्याची आवश्यकता असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

नागरिकांनी देखील सजग राहून भूस्खलनाची लक्षणे दिसताच प्रशासनाशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आपत्कालीन यंत्रणांनी नियंत्रण कक्ष कार्यान्वित केले असून, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

Share this story

Latest