Health | कॉफीच्या नावाखाली तुम्ही विष तर पित नाही ना? केवळ ५ मिनिटांत तपासा कॉफीमधील भेसळ

सकाळी उठल्यानंतर तुम्ही पित असलेल्या कॉफीमध्येही माती मिसळलेली असू शकते हे तुम्हाला माहिती आहे का?

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sat, 1 Feb 2025
  • 07:00 am
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

भारतासारख्या देशांमध्ये, अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणे आणि  अन्नपदार्थांची बनावट पद्धतीने विक्री करणे ही  सामान्य बाब आहे. पीठ-तांदूळ यांपासून साखर, तेल, दूध, मसाले, फळे-भाज्या अशा जवळजवळ सर्वच अन्नपदार्थांमध्ये धोकादायक रसायने, माती, चुना, दगड, विटांची पावडर आणि इतर अनेक घाणेरड्या गोष्टींची भेसळ केली जाते. अर्थात, भेसळयुक्त पदार्थ खाल्ल्याने किरकोळ आजारांपासून ते कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारांचा धोका निर्माण होतो.

सकाळी उठल्यानंतर तुम्ही पित असलेल्या कॉफीमध्येही माती मिसळलेली असू शकते हे तुम्हाला माहिती आहे का? कॉफी पावडरमध्ये माती मिसळणे हा एक नवीन प्रकार आता समोर आला आहे. यामध्ये माती, विटांची धूळ किंवा बारीक पावडर घालून कॉफीचे वजन आणि प्रमाण वाढवले ​​जाते. यामुळे कॉफीची गुणवत्ता तर कमी होतेच, पण ती आरोग्यासाठीही हानिकारक ठरू शकते.

कॉफी हे जगातील सर्वात जास्त सेवन केले जाणारे पेय आहे. कॉफीचा सुगंध तसेच त्यपासून मिळणाऱ्या ऊर्जेसाठी कॉफी प्रचंड लोकप्रिय आहे.  वाढत्या मागणीमुळे आणि अधिक नफा कमावण्यासाठी काही व्यापारी कॉफी पावडरमध्ये मातीसारखे पदार्थ मिसळून तुमच्या आरोग्याशी खेळतात.

कॉफीपेक्षा माती स्वस्त मिळते. म्हणून भेसळ करणारे कॉफीचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि अधिक नफा मिळविण्यासाठी त्यात माती मिसळतात. कॉफीचं एखादं पीक अपयशी ठरल्यास किंवा पुरवठा खंडित झाल्यास, काही व्यापारी प्रमाण वाढवण्यासाठी मातीची भेसळ करतात. ग्राहकांकडून कॉफीच्या शुद्धतेची योग्य तपासणी न केल्याने भेसळ करणाऱ्यांना अधिकच प्रोत्साहन मिळते. कमी किमतीत कॉफी खरेदी करणारे ग्राहक अनेकदा न तपासलेले, स्वस्त ब्रँड निवडतात. ज्यामध्ये भेसळ असण्याची शक्यता जास्त असते. शिवाय, काही देशांमध्ये अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता देखरेख तुलनेने कमकुवत आहे. त्यामुळे अशा अयोग्य पद्धती अंमलात आणणे सोपे होते.

कॉफी पावडरमध्ये बारीक माती किंवा धूळ घालून त्याचे वजन वाढवले ​​जाते. तसेच यामुळे कॉफीच्या पोतमध्ये फारसा बदल होत नाही. लाल माती किंवा बारीक विटांची पूड घातल्याने कॉफीचा रंग गडद दिसतो. काही भेसळ करणारे कॉफी पावडरला मातीचे कण जोडण्यासाठी स्टार्च किंवा डेक्सट्रिन वापरतात. त्यामुळे भेसळ शोधणे कठीण होते. त्याच वेळी, काही व्यापारी कॉफी पावडरवर पाणी आणि मातीचे द्रावण शिंपडतात.  नंतर ते वाळवतात. त्यामुळे भेसळ नैसर्गिक दिसते आणि सहज ओळखता येत नाही.

भेसळयुक्त कॉफी पिण्याचे हानिकारक परिणाम
मातीचे कण पचायला कठीण असतात. त्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचन होऊ शकते. माती आणि धुळीमध्ये असलेले बॅक्टेरिया, बुरशी आणि परजीवी शरीरात गेल्यास अतिसार आणि पोटात संसर्ग होऊ शकतो. मातीमध्ये शिसे, आर्सेनिक आणि कॅडमियम सारखे विषारी धातू असू शकतात. जे शरीरात जमा होऊ शकतात आणि मूत्रपिंड तसेच मज्जासंस्थेला नुकसान पोहोचवू शकतात.

भेसळयुक्त कॉफी जास्त काळ पिल्याने यकृत, मूत्रपिंड आणि आतड्यांचे नुकसान होऊ शकते. काही प्रकारच्या मातीमध्ये जास्त प्रमाणात फ्लोराईड असते. ज्यामुळे हाडे कमकुवत होऊ शकतात आणि सांधेदुखी होऊ शकते.

बारीक मातीचे कण श्वास घेतल्याने फुफ्फुसांना त्रास होऊ शकतो. विशेषतः दम्याच्या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.  माती शरीरातील लोह, कॅल्शियम आणि जस्त शोषण्यास अडथळा आणू शकते. त्यामुळे अशक्तपणा आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by FSSAI (@fssai_safefood)

कॉफी पावडरमध्ये भेसळ कशी ओळखावी?

एका ग्लासमध्ये पाणी घ्या.

एका ग्लास पाण्यात अर्धा चमचा कॉफी पावडर घाला.

पाच मिनिटे थांबा.

शुद्ध कॉफी पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगते

भेसळयुक्त कॉफीमधील माती तळाशी जाते.


Disclaimer : वर दिलेल्या माहितीनुसार कृती करण्यापूर्वी, कृपया तज्ञांचा सल्ला घ्यावा.  civic mirror याद्वारे कोणताही दावा करत नाही.

Share this story

Latest