संग्रहित छायाचित्र
World Cancer Day | जागतिक आरोग्य संघटनेनुसार २०२२ मध्ये कर्करोग हा जगातील मृत्यूचे प्रमुख कारण होता. कर्करोगामुळे त्या वर्षी एक कोटी लोकांचे मृत्यू झाले.
कर्करोग या प्राणघातक रोगाचा प्रतिबंध, निदान आणि उपचारांबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच या आजाराबद्दल लोकांना शिक्षित करण्यासाठी दरवर्षी ४ फेब्रुवारी हा दिवस ' जागतिक कर्करोग दिन' म्हणून पाळला जातो. यंदा मंगळवारी, ४ फेब्रुवारी २०२५ ला जागतिक कर्करोग दिन पाळला जात आहे.
जागतिक कर्करोग दिनी जगभरातील लोक आणि लोकांचे विविध गट कर्करोगाविरुद्धच्या लढाईत लवकर निदान होणे, जास्तीत जास्त तपासण्या, अत्याधुनिक उपचार पर्याय आणि मजबूत आंतरराष्ट्रीय प्रयत्नांच्या गरजेवर भर देण्यासाठी एकत्र येतात. तसेच जगभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये रॅली, पदयात्रा आणि कर्करोगाबद्दल लोकांना शिक्षित करण्यासाठी विविध सादरीकरणे यांचा समावेश होतो. तसेच कर्करोग संशोधन आणि उपचारांना पाठिंबा देण्यासाठी विविध माध्यमांतून निधी संकलन केले जाते.
'जागतिक कर्करोग दिन' हा आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघाचा (UICC) उपक्रम आहे. पॅरिस येथे सन २००० मध्ये झालेल्या जागतिक परिषदेत कर्करोगविषयक मसुदा (World Summit Against Cancer) मांडण्यात आला. या परिषदेत जगभरातील शासकीय उच्चपदस्थ अधिकारी आणि कर्करोगविषयक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी पॅरिसच्या कर्करोगविषयक सनदेला मान्यता दिली. ही सनद कर्करोगसंबंधित संशोधन आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना याकरिता आर्थिक गुंतवणूक करणे, कर्करोगग्रस्त रूग्णांचे जीवनमूल्य उंचावणे तसेच त्यांना योग्य उपचार देणे अशा तत्त्वांचा पुरस्कार करते. सनदेत अधिकृतरीत्या ४ फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक कर्करोग दिवस’ म्हणून जाहीर केला गेला.
२०२५ ते २०२७ या तीन वर्षांत चालणारी कर्करोग विरोधी मोहीम, प्रत्येक व्यक्तीचा कर्करोगाचा अनुभव हा वेगळा असतो हे समजून घेऊन, कस्टमाइज्ड केअरचे महत्त्व अधोरेखित करणार आहे. कर्करोगाची काळजी आणि जागतिक आरोग्य प्रणालींमध्ये लोक-केंद्रित दृष्टिकोनामध्ये मोठ्या परिवर्तनाचा पुरस्कार करते. या कार्यक्रमाची थीम “युनाइटेड बाय युनिक” अशी असणार आहे.
भारतामध्ये सन २०१४ पासून ७ नोव्हेंबर यादिवशी राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिवस साजरा करण्यात येतो.