पुण्यात सायबर फसवणुकीचा वाढता धोका…
पुण्यासारख्या शहरात, जिथे दैनंदिन जीवनात डिजिटल तंत्रज्ञान खोलवर रुजले आहे तिथे ऑनलाइन बँकिंग, यूपीआय पेमेंट्स, सोशल मीडिया आणि एआय साधनांचा वापर सर्रास सुरु झाला आहे. तिथे सायबर फसवणुकीचा धोका आता केवळ संशयास्पद लिंक किंवा अनोळखी कॉलपुरता मर्यादित राहिलेला नाही. आता फसवणूक करणारे लोक स्वतः वापरकर्त्यांनी ऑनलाइन शेअर केलेल्या माहितीचाच वापर करत आहेत. पुण्यासारख्या मोठ्या शहरात या धोकादायक शेअरिंगमुळे सायबर फसवणूक करणाऱ्या भामट्यांना आयतेच कोलित मिळते.
वाढदिवस, वैयक्तिक माहिती, पासवर्ड, ब्राउझिंग सवयी यांसारखी छोटी-छोटी माहितीही आर्थिक सुरक्षिततेला धोका निर्माण करू शकते. सायबर तज्ञांच्या मते, जे काही आपल्याला साधे आणि निरुपद्रवी वाटते, तेच फसवणूक करणाऱ्यांसाठी प्रवेशद्वार ठरू शकते. अलीकडील सायबर गुन्हे तपासांमध्ये असे दिसून आले आहे की आजकालच्या अनेक फसवणुका या केवळ तांत्रिक हॅकिंगवर आधारित नसतात, तर त्या ‘डेटा ड्रिव्हन स्कीम्स’ असतात. यात गुन्हेगार लोकांची वैयक्तिक माहिती हळूहळू गोळा करतात आणि योग्य वेळी तिचा वापर करून खात्यांमध्ये प्रवेश मिळवतात किंवा विश्वासार्ह गोष्टी तयार करून फसवणूक केली जाते.
पुण्यात वाढती चिंता
पुण्यात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी, व्यावसायिक आणि डिजिटल वापरकर्ते असल्यामुळे अशा डेटा ड्रिव्हन सायबर फसवणुकीचा धोका अधिक आहे. विशेष म्हणजे, ही फसवणूक अचानक सुरू होत नाही. अशी प्रकरणे आपल्या दैनंदिन सवयींमधूनच सुरू होतात. अनेक प्रकरणांमध्ये असे दिसून आले आहे की फसवणूक करणाऱ्यांकडे आधीच काही वैयक्तिक माहिती असते, ज्यामुळे ते विश्वासार्ह वाटतात. यावरून हे स्पष्ट होते की लहान माहिती लीक झाली तरी ती मोठ्या फसवणुकीचे कारण ठरू शकते.
वैयक्तिक माहिती शेअर करण्याचा धोका
आजकाल वेबसाइट, अॅप किंवा एआय टूल्स वापरताना वैयक्तिक माहिती देणे ही सर्वसामान्य सवय झाली आहे. उदाहरणार्थ, सवलती, ज्योतिष माहिती किंवा साध्या वापरासाठी अनेक लोक आपली जन्मतारीख सहजपणे देतात. पण ही माहिती दिसते तितकी साधी नसते.
यासंदर्भात ‘सीविक मिरर’ला महत्वाची माहिती देताना सायबरतज्ज्ञ डॉ. रोहन न्यायाधीश म्हणाले, ‘‘जन्मतारीख ही केवळ वैयक्तिक माहिती नसून ती बँक खात्यांशी आणि आर्थिक ओळखीशी संबंधित महत्त्वाची केवायसी माहिती असते. त्यामुळे ती सहजपणे शेअर केल्यास ओळख दुरुपयोगाचा धोका वाढतो.’’
जागतिक सायबर सुरक्षा मार्गदर्शक तत्वांनुसार, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी यांसारखी माहिती एकत्र करून फसवणूक करणारे व्हॅरिफिकेशन प्रणालीही चुकवू शकतात. त्यामुळे अनोळखी वेबसाइट्सवर खरी जन्मतारीख देणे टाळावे आणि शक्य असल्यास बदललेली माहिती वापरावी, असे तज्ज्ञ सुचवतात.
पासवर्ड : सर्वात कमकुवत कडी
सायबर सुरक्षेतील आणखी एक मोठी समस्या म्हणजे सोपे आणि अंदाज लावता येणारे पासवर्ड. अनेक लोक अजूनही आईचे माहेरचे नाव, शाळेचे नाव किंवा पाळीव प्राण्याचे नाव यांसारखी वैयक्तिक माहिती पासवर्ड किंवा सुरक्षा प्रश्नांसाठी वापरतात.
डॉ. न्यायाधीश सांगतात की, हॅकर्स नेहमी सिस्टीम तोडत नाहीत, ते तुमच्या सवयी आणि पॅटर्न समजून घेतात. जर पासवर्ड वैयक्तिक माहितीवर आधारित असेल, तर खाते हॅक करणे खूप सोपे होते. म्हणूनच मजबूत आणि वेगळे पासवर्ड वापरणे आवश्यक आहे. अक्षरे, अंक आणि चिन्हे यांचा वापर करून पासवर्ड तयार करावा. एकाच पासवर्डचा अनेक ठिकाणी वापर केल्यास धोका वाढतो. कारण एका ठिकाणी डेटा लीक झाला तर इतर खात्यांनाही धोका निर्माण होतो.
सार्वजनिक वायफाय : न दिसणारा धोका
पुण्यातील कॅफे संस्कृती आणि को वर्किंग स्पेसेस वाढल्यामुळे सार्वजनिक वायफायचा वापर वाढला आहे. मात्र, अशा नेटवर्कवर आर्थिक व्यवहार करणे धोकादायक ठरू शकते. सायबर गुन्हेगार ‘मॅन इन द मिडल’सारख्या तंत्रांचा वापर करून तुमची माहिती चोरू शकतात. यात लॉगिन तपशील, ओटीपी यांसारखी संवेदनशील माहिती सहज मिळवली जाऊ शकते. तज्ञांचा सल्ला असा आहे की, सार्वजनिक वायफाय वापरताना बँकिंग किंवा पेमेंट व्यवहार करू नयेत. त्याऐवजी स्वतःचा मोबाईल डेटा किंवा सुरक्षित नेटवर्क वापरावे.
एआय टूल्स : सोयीसोबत सावध राहणे
एआय चॅटबॉट्स आणि इतर साधनांमुळे कामे सोपी झाली आहेत. पण अनेक लोक नकळत या प्लॅटफॉर्मवर संवेदनशील माहिती शेअर करतात. डॉ. न्यायाधीश यांच्या मते, लोक एआय टूल्सना खासगी जागा समजतात. पण तेथे दिलेली माहिती कुठे साठवली जाते आणि कशी वापरली जाते याची जाणीव नसते. त्यामुळे काय टाइप करतो किंवा अपलोड करतो, याबाबत सावध राहणे आवश्यक आहे. कामासाठी एआय वापरताना त्याच्या सुरक्षित आणि अधिकृत आवृत्त्या वापरण्याचा सल्ला दिला जातो.
पासवर्ड कुठे साठवता हेही महत्त्वाचे
अनेक लोक फोनमधील नोट्स अॅपमध्ये पासवर्ड साठवतात, जे खूप धोकादायक ठरू शकते. फोन हॅक झाला तर सर्व माहिती उघड होऊ शकते. तज्ञांच्या मते, पासवर्ड मॅनेजर वापरणे अधिक सुरक्षित आहे, कारण ते माहिती एन्क्रिप्ट करून ठेवतात. तसेच टू-फॅक्टर ॲथाॅंटिकेशन (टूएफए) सुरू केल्यास अतिरिक्त सुरक्षा मिळते.
आपली माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी या गोष्टी टाळा
आजच्या डिजिटल युगात सायबर सुरक्षा म्हणजे केवळ संशयास्पद लिंक टाळणे नव्हे, तर आपण कोणती माहिती, कुठे आणि कशी शेअर करतो याची जाणीव ठेवणे आहे. मजबूत पासवर्ड वापरणे, सार्वजनिक वायफाय टाळणे आणि वैयक्तिक माहिती मर्यादित ठेवणे यांसारख्या साध्या सवयी मोठा फरक करू शकतात. तुमची माहिती सुरक्षित ठेवणे म्हणजेच तुमचे पैसे सुरक्षित ठेवणे होय.


