गणेशोत्सवात हजारो कोटींची उलाढाल
नितीन गांगर्डे
पुण्यातील गणेशोत्सव देशभर नव्हे तर जगभर प्रसिद्ध आहे. साऱ्या देशाचे आकर्षण ठरलेल्या पुण्यामध्ये गणेशोत्सव काळात हजारो कोट्यवधींची उलाढाल होत असते. उत्सवाच्या माध्यमातून दरवर्षी पुण्यात जवळपास शेकडो कोटींच्या आसपास उलाढाल होते. पुण्यातील गणेशोत्सवाला शंभर वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा आहे. उत्सवादरम्यान शहरातील अनेक भागातील मंडळे, दुकानदार, व्यापारी, कामगारांमध्ये मोठी आर्थिक उलाढाल होत असते.
या उत्सवासाठी आवश्यक असणारे साहित्य हे देशभरातील विविध भागातून येते. मंडप उभारणीसाठी व इतर कामांसाठी कामगारही देशभरातून येतात. आनंदाबरोबर रोजगाराला चालना देणारा हा उत्सव आहे. या वर्षी गणेशोत्सवाच्या काळात देशभरात जवळपास ६० हजार कोटींची उलाढाल होण्याची शक्यता असल्याचे गणेशोत्सवाचे अभ्यासक आनंद सराफ यांनी ‘सीविक मिरर’शी बोलताना सांगितले.
पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवात ज्येष्ठ नेत्यांची व्याख्याने, सामाजिक जागृती करणारे मेळे, मोठ्या गायकांच्या मैफली, कलाकारांनी सादर केलेली नाटके, जिवंत देखावे आदी सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. याशिवाय आरास, देखावे, सजावट, पूजेच्या साहित्याची खरेदी-विक्री या माध्यमातून बाजारपेठेत हजारो कोटींची उलाढाल होत असल्याचे सराफ यांनी सांगितले.
उत्सवात अनेकांच्या हाताला रोजगार मिळण्यास मदत होते. गणेशोत्सवावर अवलंबून अनेक व्यापारी, कामगार असतात. दरवर्षी पुणे शहरात अनेक भागातील नागरिक खरेदीसाठी येत असतात. यातून जवळपास ८५० कोटींची उलाढाल होते. पुणे शहरात छोटी-मोठे नोंदणी असलेले, सोसायटीमधील असे एकूण हजारो गणेश मंडळे आहेत. या मंडळांनी काळानुरूप परिवर्तनशीलता जोपासलेली पाहावयास मिळते. त्यांनी लोकोपयोगी सकारात्मक बदल केले आहेत. त्यामध्ये मंडळाच्या रचनेमध्ये बदल होत असल्याचे पाहावयास मिळते. काही मंडळांनी आता रस्त्यावर वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून मांडवात बदल केल्याचे पाहावयास मिळते. यामध्ये वाहनांना जाण्या-येण्यासाठी पुरेशी जागा सोडून रस्त्याच्या वर मांडव बांधले जातात. विशेषतः अतिशय गर्दीच्या ठिकाणी असे बदल केले आहेत.
गणेशोत्सवात लागणारे साहित्य देशातील विविध राज्यातून येत असते. मांडव बांधण्यासाठी आवश्यक असणारे बांबू हे आसाम राज्यातून येतात. ताडपत्री पश्चिम बंगाल या राज्यातून येते. हळदी कुंकवाचे तबक हे उत्तर प्रदेशातील मुस्लीम महिलांनी बनवलेले असतात. पूजेसाठी लागणारे तांदूळ, नारळ हे दक्षिणेतील राज्यातून येतात. प्लास्टर ऑफ पॅरिस, शाडू माती ही गुजरात, कच्छ भागातून येते. मंगलमूर्तींना रंग देण्याचे काम मोठ्या प्रमाणावर मुंबईमध्ये चालते. तेथे त्यांचे मोठे कारखाने आहेत. आराससाठी वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम फुलांच्या माळा या पंजाब राज्यातून येतात. मंडप उभारणीसाठी अनेक कामगार हे कलकत्ता, कोल्हापूर येथून येतात. कलकत्ता येथून येणारे कामगार येथे रंगीत कापडांच्या घड्यांचे मंडप उभारण्याचे काम करतात. यामध्ये कोकणातील मंडळींचाही मोठा सहभाग असतो. शेतीतून येणारी विविध प्रकाराची नैसर्गिक फुलांची आवकही या काळात प्रचंड असते. शेतकऱ्यांपासून ते माळा गुंफण्यापर्यंत अनेकांचा यात सहभाग असून त्यातून मोठी आर्थिक उलाढाल होत असते. गणपतीसाठी चाफा, केवडा, गुलाब, झेंडू, गुलछडी अशा विविध फुलांना मोठी मागणी असते. तोरण, मोरपिस असे साहित्य विकणारी मंडळी ही आग्रा, जयपूर भागातून येतात. यामुळे हा उत्सव आनंदाचा, एकात्मतेचा आणि मोठ्या प्रमाणावर हजारो कामगारांना, रोजगाराला चालना देणारा हा उत्सव आहे.
रवींद्र माळवदकर यांनी ‘सीविक मिरर’ शी बोलताना सांगितले की, या उत्सवासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्यात पूर्वीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर वैविध्य आले आहे. मिठाईत वैविध्य आले आहे. मोदक आता आईस्क्रीमच्या स्वादाचे मिळतात. गणेशोत्सव हा सार्वजनिक असला तरी घराघरांतही मंगल मूर्तींची भाविक प्रतिष्ठापना करतात. त्यामुळे यातून बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर उलाढाल होत असते. पुणे शहरातूनच गणेशोत्सवाची सुरुवात झाली. आज या उत्सवाचे स्वरूप भव्य दिव्य झाल्याचे पाहावयास मिळते. या उत्सवाचा महत्त्वाचा गुणधर्म हा परिवर्तनशीलता असल्याचे सराफ यांनी सांगितले.