पुण्याचा गणेश उत्सव आणि इतिहास जगात पोहचण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल
पुण्यनगरीच्या गणेश उत्सवाची सुरवातीपासून इत्यंभूत माहिती देणाऱ्या स्वप्नील नहार आणि सुप्रसाद पुराणिक लिखित पुणे गणेश फेस्टिवल आणि पुणे शहरातील वारसा स्थळ, घटना यांचा मागोवा घेणारे ज्ञात अज्ञात पुणे या दोन्ही पुस्तकांचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. जेष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे, दुर्गाभ्यासक प्र. के. घाणेकर आणि गणेश उत्सव अभ्यासक आनंद सराफ यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला आहे.
पुण्यातील सदाशिव पेठेतील भारत संशोधन मंडळमध्ये जेष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे यांनी या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन झाले. यावेळी पुण्याचा गणेश उत्सव आणि इतिहास जागतिक पातळीवर पोहचवाण्याच्या दृष्टीने ही दोन्ही पुस्तक महत्वाची ठरतील असा विश्वास वलकवडे यांनी व्यक्त केला. तसेच भविष्यात या दोन्ही लेखकांणी पुण्यातील पुस्तकांचा मंदिर कोष बनवावा ही इच्छा व्यक्त केली.
यावेळी प्र. के. घाणेकर यांनी ज्ञात अज्ञात पुणे पुस्तकात विविध बागा, ताबूत, घटना यांच्या अज्ञात माहितीचे उत्तम डॉक्युमेंटेशन झाल्याचे सांगताना या पुस्तकांचे अनेक भाग यावेत ही इच्छा व्यक्त केली. गणेश उत्सव अभ्यासक आनंद सराफ यांनी गणेश उत्सवाचे अर्थकारण समजावताना गणेश उत्सव सर्व समावेशक कशा प्रकारे आहे हे रंजक पद्धतीने समजावले. पुण्याच्या गणेश उत्सवाचे हे इंग्रजी पुस्तक एक उत्तम डॉक्युमेंटेशन ठरेल हा विश्वास व्यक्त केला.
लेखक स्वप्नील नहार यांनी पुणे गणेश फेस्टिवल या इंग्रजी पुस्तकाची माहिती देताना हे पुस्तक आपली भारतीय संस्कृती आणि आपला गणेश उत्सव जागतिक पातळीवर पोहचण्यासाठी महत्वाचा दुवा ठरणार असल्याचे सांगितले. मोडी लिपीच्या अभ्यासातून पुणे शहरातील मंदिरे आणि सण समारंभ यांच्या अनेक नोंदी या पुस्तकातून मांडल्याचे सुप्रसाद पुराणिक यांनी सांगितले.
यावेळी प्रकाशन संस्था मर्वेन टेकनॉलॉजिचे मनोज केळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. सूत्रसंचालन आशिष जरांड यांनी केले. सदर कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव मंडळाचे आणि विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते, वारसा प्रेमी आणि पुणेकर नागरिक उपस्थित होते.