धर्मा प्रॉडक्शन्सने त्यांच्या आगामी ‘चांद मेरा दिल’ या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित करत प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. करण जोहर निर्मित या सिनेमात अनन्या पांडे आणि लक्ष्य मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. लक्ष्य ‘आरव’, तर अनन्या ‘चांदनी’ची भूमिका साकारत आहे.
पोस्टरमध्ये लक्ष्यचा शर्टलेस लूक आहे, याविषयी बरीच चर्चा मीडियावर रंगली आहे. “प्रेमाचा कोणताही मार्ग नसतो… थोडं वेडं व्हावं लागतं. आमच्या आरव आणि चांदनीला भेटण्यासाठी सकाळी ११ वाजता भेटूया.” असे कॅप्शन पोस्टरबरोबर आहे.
यामुळे पिक्चरचा टीझर किंवा ट्रेलर उद्या प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले असून प्रेक्षकांकडून प्रतिक्रिया येत आहेत. लक्ष्यच्या लूकचे कौतुक होत असून अनन्या पांडेच्या कास्टिंगवर काही नेटकरी नाराजी व्यक्त करत आहेत.
काही जण “पुन्हा अनन्या?” असे म्हणत ट्रोल करत आहेत, तर काहींनी ‘चांदनी’ या पात्रासाठी अधिक प्रभावी अभिनेत्रीची अपेक्षा व्यक्त केली आहे. तरीही या सिनेमाची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. अनन्या पांडे ही बॉलिवूडमधील एक लोकप्रिय तरुण अभिनेत्री आहे. जी तिच्या स्टाइल, सोशल मीडिया उपस्थिती आणि सिनेमांमुळे चर्चेत असते. ती अभिनेते चंकी पांडे यांची मुलगी आहे. अनन्याने २०१९ मध्ये आलेल्या स्टुडंड अॅाफ द इअर २ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे.


