२०१५ मधील सुपरहीट ‘देऊळ बंद’ सिनेमानंतर तब्बल ११ वर्षांनी दुसरा भाग ‘देऊळ बंद २’ प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी या सिनेमाचे डिजिटल पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. “आता परीक्षा देवाची” अशी कॅप्शन असलेल्या या चित्रपटात पुन्हा अध्यात्म आणि विज्ञान यांचा संघर्ष पाहायला मिळणार आहे.
अभिनेते तरडे यांनी चित्रपटाची तारीख जाहीर केली असून एक डिजिटल पोस्टर शेअर केले आहे. अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालणारा हा चित्रपट आहे. देऊळबंदला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. श्रीस्वामी समर्थ महाराज आणि वैज्ञानिक यांच्या भोवती फिरणाऱ्या कथेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली होती. या सिनेमाची एक झलक तरडे यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. आता परीक्षा देवाची अशी कॅप्शन लिहिली आहे.
तरडे यांनी आत्तापर्यंत ‘देऊळ बंद’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘धर्मवीर’ आणि ‘धर्मवीर २’ असे सलग पाच सुपरहिट चित्रपट दिले आहेत. हे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमालीचे यशस्वी ठरले. आता ‘देऊळ बंद २’ हा त्यांचा आगामी चित्रपट आहे. डिजिटल पोस्टर प्रदर्शित झाले असले तरी चित्रपटात कोणते कलाकार मुख्य भूमिकेत असतील हे अद्याप कळलेलं नाही.
पहिल्या भागात मोहन जोशी यांनी श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारली होती, ती भूमिका यावेळी कोण साकारणार? आणि मुख्य शास्त्रज्ञाच्या भूमिकेत कोण असेल? यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. आज वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित देऊळ बंद २ चित्रपट २१ मे २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.


