Advertisement

संपादकीय : साहित्यविश्वातील महामानव

प्रत्येक मनुष्य हा काळाचे, परिस्थितीचे अपत्य असतो. त्यात तो साहित्यिक असेल तर मग हे तत्व अधिकच प्रभावी रितीने लागू होते. हसन जिल्ह्यातील एका खेड्यामध्ये दारिद्र्यात जन्मलेल्या भैरप्पांच्या आयुष्यात लहानपणीच आलेल्या मृत्यूच्या वियोगाने आणि संघर्षांनी त्यांच्या लेखनाला भावनिक खोली दिली. वयाच्या नवव्या वर्षी प्लेगने घेतलेला दोन भावंडांचा बळी आणि अकराव्या वर्षी आईचे निधन या दु:खांनी त्यांच्या मनावर खोल ठसा उमटवला. या घटनांनी त्यांच्या कादंबऱ्यांतील व्यक्तिरेखांना वास्तवतेची धार दिली. त्यामुळेच त्यांच्या कादंबऱ्यांतील पात्रे जीवनातील क्रूर वास्तवाचे सजीव प्रतीक ठरतात. ‘गृहभंग,’ ‘दाटु,’ (मराठी अनुवाद ‘जा ओलांडुनी) ‘पर्व’ अशा अनेक कादंबऱ्यांतून त्यांनी मानवी जीवनातील वेदना, संघर्ष, सामाजिक विषमता आणि सांस्कृतिक संघर्षांचे अप्रतिम चित्रण केले.

भैरप्पांचे लेखन केवळ कथा सांगत नाही; ते समाजाचे चिंतन घडवते. ‘तब्बालियू नीनाडे मगाणे’ या कन्नड कादंबरीत भारतीय आणि पाश्चात्य मूल्यव्यवस्थांतील संघर्षाचे त्यांनी मांडलेले चित्र आजही समकालीन वाटते. ‘दाटु’मध्ये जातिसंस्थेच्या बंधनाविरुद्ध एल्गार पुकारणाऱ्या स्त्रीचे धाडस आहे. या कादंबरीसाठी त्यांना कर्नाटक साहित्य अकादमी आणि केंद्र सरकारचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. ‘पर्व’ या कादंबरीत त्यांनी महाभारत आगळ्यावेगळ्या पद्धतीने समोर आणले. धर्म, समाजरचना आणि मानवी नैतिकतेचे समाजशास्त्रीय आणि मानववंशशास्त्रीय विश्लेषण करून त्यांनी या महाकाव्याला नवे आयाम दिले. महाभारताला त्यांनी धार्मिक आख्यायिका न मानता या ग्रंथातून मूल्यव्यवस्था, सत्तासंघर्ष, नैतिकता आणि मानवी नात्यांची नवी उकल त्यांनी केली. कोणताही चमत्कार, दैवी शक्ती याचा उल्लेख नसलेले ‘पर्व’मधील महाभारत वाचताना हे महाकाव्य प्रत्यक्षात घडले असेल तर यापेक्षा वेगळे घडले नसणार, असा विश्वास वाचकांना देण्याची ताकद त्यांच्या प्रामाणिक लेखनीने निर्माण केली. ‘मंद्र’ मध्ये संगीताचा आस्वाद, ‘आवरण’ मध्ये इतिहासाचा पुनर्प्रश्न, ‘उत्तरकांड’ मध्ये रामायणाचे पुनर्निर्माण अशा अनेक प्रयोगशील लेखनातून भैरप्पांनी वाचकांना सतत विचारमंथन घडवून आणले. ‘आवरण’मध्ये इतिहास आणि धार्मिक संघर्षांवरील त्यांची भिन्न भूमिका वाचकांसमोर आली. या कादंबरीमुळे लोकप्रियतेबरोबरच वादही त्यांच्या वाट्याला आले.

भैरप्पा यांनी समाजातील पोकळी, अंधश्रद्धा, जातीय विषमता, तसेच भारतीय संस्कृतीवरील पश्चिमी आक्रमण यांचा परखड अभ्यास केला. त्यामुळे त्यांच्या लिखाणावर टीका झाली आणि प्रचंड वादही झडले. गिरीश कर्नाड यांच्यासोबतच्या टिपू सुलतानवरील वादाने तर साहित्यविश्व दोन भागांत विभागले गेले. गिरीश कर्नाड यांच्यासोबत त्यांचा झालेला टिपू सुलतानवरील वाद साहित्यविश्वात गाजला. कर्नाड यांनी टिपूला प्रगतिशील म्हणून चित्रित केले, तर भैरप्पा यांनी त्याला धार्मिक कट्टरतेचे प्रतीक मानले. यामुळे त्यांना हिंदुत्ववादी ठरवले गेले. अनंतमूर्ती यांच्यासोबतचा त्यांचा वादही चर्चेत राहिला. भैरप्पा ठामपणे म्हणत, “मी विचारधारेसाठी नाही, तर सत्यासाठी लिहितो.” लेखक हा वादक-संशोधक असतो, हे तत्व त्यांनी आयुष्यभर जपले आणि विरोधी विचारांबाबतही हीच भूमिका ठेवली.

साहित्यिक पुरस्कारांची शृंखला या सरस्वतीच्या साधकाच्या नावावर आहे. केंद्रीय साहित्य अकादमी पुरस्कार, सरस्वती सन्मान, पद्मश्री, पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार हे सर्व सन्मान त्यांच्या साहित्याच्या वैभवाची साक्ष देतात. मात्र स्वतः भैरप्पा म्हणायचे, ‘‘आजच्या बाजारपेठेपेक्षा शतकांनंतर माझ्या लेखनाला काय स्थान मिळेल, हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.’’ त्यांनी उभे केलेले प्रश्न, मांडलेले संघर्ष, दाखवलेले मूल्यांतील द्वंद्व हे वर्तमानासह भावी पिढ्यांनाही तितकेच लागू असतील.

Keep Up to Date with the Most Important News

By pressing the Subscribe button, you confirm that you have read and are agreeing to our Privacy Policy and Terms of Use
Add a comment Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post

मुंबईच्या कोस्टल रोड टनेलमध्ये बर्निंग कारचा थरार...

Next Post

पुरंदर विमानतळ प्रकल्पाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ९४ टक्के जमिनीला संमती