Advertisement

संपादकीय : राजकीय संस्कृतीची कसोटी

महाराष्ट्र हे देशातील एक असे राज्य आहे, ज्याने देशाला केवळ सुधारणावादी आणि प्रगत विचारच दिले नाहीत, तर राजकारणातही एक सुसंस्कृत पायंडा पाडला आहे. वैचारिक मतभेद कितीही तीव्र असले, तरी एखाद्या मोठ्या नेत्याच्या निधनानंतर होणारी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची एक अलिखित परंपरा महाराष्ट्रात अनेक दशकांपासून जोपासली गेली आहे. मात्र,गेल्या काही वर्षातील राजकारणाच्या बदलली समीकरणे, कुरघोडीच्या आणि खुनशी राजकारणामुळे एकूणच महाराष्ट्राची राजकीय संस्कृतीची रया गेली आहे.

‘विकासपुरुष’ अशी ओळख असलेल्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभेच्या जागेसाठी आता निवडणूक होत आहे. या निवडणुकीमुळे ही निवडणूक बिनविरोध होणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अनेक दिग्गज नेत्यांच्या निधनानंतर राजकीय पक्षांनी पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून आदरांजली म्हणून पोटनिवडणूक बिनविरोध केली आहे. ही केवळ राजकीय सोय नव्हती, तर त्या नेत्याने केलेल्या जनसेवेबद्दलची ती कृतज्ञता असायची. हीच महाराष्ट्राची खरी ओळख संपूर्ण देशात ‘राजकीय सुसंस्कृतपणा’ म्हणून ओळखली जाते.

अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या, विशेषतः बारामतीच्या विकासामध्ये जे योगदान दिले आहे, ते कोणालाही नाकारता येणार नाही. पहाटेपासून कामाला लागणारा हा लोकनेता प्रशासकीय दरारा आणि कामाच्या झपाट्यासाठी ओळखला जायचा. त्यांच्या निधनानंतर बारामतीकरांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाराष्ट्राची परंपरा पाहता, ही निवडणूक बिनविरोध होईल अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली होती. मात्र, काँग्रेसने ही जागा लढण्याचा निर्णय घेतल्याने ही निवडणूक होणार हे स्पष्ट झाले आहे.

अलिकडच्या काही वर्षांत महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे अत्यंत गुंतागुंतीची झाली आहेत. पक्षांमधील फूट, सत्तासंघर्ष आणि एकमेकांवरील टोकाची टीका यामुळे जुन्या परंपरा मागे पडताना दिसत आहेत. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या वेळी भाजपने आपला उमेदवार मागे घेऊन एक पाऊल मागे घेतले होते, मात्र त्यानंतरच्या काही निवडणुकांमध्ये असा दिलदारपणा दिसून आला नाही. बारामती ही महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्र आहे, त्यामुळे येथील लढत केवळ एका जागेसाठी नसून ती प्रतिष्ठेची बनली आहे.

बारामतीची ही पोटनिवडणूक केवळ एका लोकप्रतिनिधीची निवड करणार नाही, तर ती महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीच्या भविष्यातील दिशेवरही शिक्कामोर्तब करणार आहे. अजित पवारांसारख्या विकासपुरुषाच्या निधनानंतर बारामतीची जनता आणि राज्यातील राजकीय पक्ष या परंपरेचे रक्षण कसे करतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. शेवटी, सत्ता येत-जात राहते, पण संस्कृती एकदा लोप पावली की ती परत मिळवणे कठीण असते.

काही राजकीय विश्लेषकांच्या मते, निवडणूक होणे हे लोकशाही जिवंत असल्याचे लक्षण आहे. मात्र, महाराष्ट्रासारख्या राज्यात जिथे ‘माणुसकी’ आणि ‘राजकारण’ यांची योग्य सांगड घातली जायची, तिथे अशा पोटनिवडणुका लढवल्या जाणे हे राजकीय कटुता वाढल्याचे निदर्शक आहे. सुनेत्रा पवार यांच्यासमोर काँग्रेसने दिलेले आव्हान हे केवळ निवडणुकीपुरते मर्यादित नसून, ते बदलत्या राजकीय संस्कृतीचे प्रतीक आहे.

Keep Up to Date with the Most Important News

By pressing the Subscribe button, you confirm that you have read and are agreeing to our Privacy Policy and Terms of Use
Add a comment Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post

Bigg Boss Marathi 6 : 'हा' तगडा स्पर्धक घराबाहेर; प्रेक्षकही झाले भावूक...

Next Post

Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे होणार १० पदरी; पावसाळ्यानंतर होणार कामाला सुरुवात...