Advertisement

संपादकीय | निसर्गाचा इशारा

निसर्ग हा मानवाचा मित्र आहे, असे शालेय निबंधात लिहिणे सहज सोपे; पण प्रत्यक्षात आपण याच मित्राचा गळा घोटण्याचे काम केले आहे. मार्च संपताना, कडाक्याच्या उन्हाऐवजी अवेळी पावसाचे ढग दाटतात, तर कधी मे महिन्यापूर्वी पारा ४५ अंशांच्या पार जातोय. हे ‘निसर्गचक्र’ बिघडलेले नाही तर आपणच ते उद्ध्वस्त केले आहे.

गेल्या अवघ्या एका दशकात पृथ्वीच्या सरासरी तापमानात १.१ अंश सेल्सिअस ते १.२ अंश सेल्सिअस इतकी वाढ झाली आहे. ही वाढ दिसायला अल्प, पण परिणाम गंभीर. भारतात अनेक शहरांमध्ये उन्हाचा पारा आता ४८अंश सेल्सिअस ते ५०अंश सेल्सिअसच्या धोकादायक पातळीपर्यंत पोहोचला आहे. हवामान बदलांचा सर्वाधिक फटका अन्नदात्याला बसत आहे. महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांत झालेल्या अवकाळी आणि गारपिटीने १५ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडती आहे. मानवाचा हव्यास इतका वाढला आहे की, जागतिक स्तरावर मिनिटाला २७ फुटबॉल मैदानांएवढी जंगले कापली जातात. ही तोड सुरू राहिली तर निसर्गाचे फुफ्फुस मानली जाणारी वने लवकरच नष्ट होतील. ‘लॅन्सेट’च्या अहवालानुसार, भारतात वर्षाला प्रदूषणामुळे २३ लाख लोकांचा अकाली मृत्यू होतो. हवा-पाणी प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

राज्यात अवकाळी पावसाचे प्रमाण वाढत असून हवामान बदलाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. काढणीच्या टप्प्यावर आलेल्या गहू, हरभरा, कांदा, द्राक्षे व आंबा पिकांचे मोठे नुकसान होत आहे. उत्पादन, दर्जा घटते आणि शेतमालाला योगग्य भाव मिळत नाही. याचा परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होतो. या पार्श्वभूमीवर शासनाने तत्काळ नुकसानभरपाई देणे आवश्यक आहे. हवामानाचा अचूक अंदाज, प्रभावी पीक विमा योजना, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन यावर भर देणे गरजेचे आहे. जलसंधारण व पर्यावरण संवर्धनातून दीर्घकालीन उपाययोजना करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

पाणी हे जीवन आहे, पण आपण ते संपवत चाललो आहोत. २०२६ पर्यंत भारतातील अनेक मोठी शहरे ‘डे झीरो’ म्हणजेच पाणी पूर्णपणे संपण्याच्या उंबरठ्यावर उभी आहेत. भू-गर्भातील पाणीपातळी खालावल्याने भविष्यात पाण्यासाठी युद्धे होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. शहरीकरणाच्या हव्यासापोटी सिमेंटची जंगले उभी केली. रस्तेरुंदीकरण आणि उत्तुंग इमारतींच्या नावाखाली झाडांची कत्तल करण्यात आली. झाड कापताना आपण लाकूड तोडत नाही, तर वातावरणातील गारवा आणि पावसाचे निमंत्रण देणारा नैसर्गिक स्रोत नष्ट करतो. शहरांमध्ये वाढलेली ‘हीट आयलंड्स’ हे याचेच जिवंत उदाहरण आहेत. दिवसा सूर्याची उष्णता शोषून घेणारी ही सिमेंटची जंगले रात्रीही थंड होत नाहीत.

हवामान बदल ही आता परदेशातील परिषदांमध्ये चर्चा करण्याची गोष्ट राहिलेली नाही. ती आपल्या दारात येऊन ठेपली आहे. कधी कडाक्याचा दुष्काळ, तर कधी ढगफुटीसारखा पाऊस यामुळे अन्नदाता हवालदिल झाला आहे. ऋतूंचे वेळापत्रक कोलमडले आहे. जेव्हा पावसाची गरज असते, तेव्हा जमीन कोरडी आणि जेव्हा पीक हाती येण्याची वेळ असते तेव्हा गारपिटीने होत्याचे नव्हते होते. हा निसर्गाचा कोप नसून मानवाच्या हस्तक्षेपाला त्याने दिलेली चपराक आहे.

निसर्ग मानवाशिवाय जगू शकतो; पण मानव निसर्गाशिवाय एक क्षणही जगू शकत नाही. आपण पृथ्वीचे मालक नाही, तर विश्वस्त आहोत. जर आज आपण आपल्या जगण्याच्या सवयी बदलल्या नाहीत, तर भविष्यातील पिढीला आपण केवळ वाळवंट आणि विषारी हवा वारसा म्हणून देऊ. निसर्ग आता आपल्याला शेवटचा ईशारा देत आहे. हा ईशारा ओळखून कृती करण्याची वेळ निघून गेली आहे, आता वेळ आहे ती ‘युद्धपातळीवर’ अंमलबजावणी करण्याची. लक्षात ठेवा, निसर्गाचा न्याय निष्ठुर असतो; तिथे कोणालाही माफी मिळत नाही!

Keep Up to Date with the Most Important News

By pressing the Subscribe button, you confirm that you have read and are agreeing to our Privacy Policy and Terms of Use
Add a comment Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post

शीतला माता मंदिरात चेंगराचेंगरी, नऊ ठार; नालंदा जिल्ह्यात चैत्र महिन्यातील शीतला अष्टमीनिमित्त दर्शनासाठी झालेली गर्दी ठरली जीवघेणी

Next Post

सावधान! 'बिग डील' ठरेल 'बिग लॉस', कमी किमतीत ब्रँडेड वस्तूंचे आमिष दाखवून बँक खाती रिकामी करण्याचा सायबर भामट्यांचा नवा फंडा