जमिनीच्या वादातून झालेल्या मानसिक त्रासाला कंटाळून एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटन घडली आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहिनी सुक्रे (वय २८) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत तिचा पती योगेश ज्ञानेश्वर सुक्रे (वय ३९, रा. केंदुर, सुक्रेवाडी, ता. शिरूर) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दगडू नानाभाऊ सुक्रे (वय ७२), भानुदास उर्फ विवेक रामदास सुक्रे (वय ३०, रा. केंदुर, सुक्रेवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दगडू सुक्रे हे फिर्यादी यांचे चुलते आहेत. तर भानुदास सुक्रे हा दगडू सुक्रे यांचा नातू आहे. आरोपी आणि फिर्यादी यांच्यात वडीलोपार्जित जमिनीवरून वाद सुरू होते. आरोपींनी मृत मोहिनी हिला जमिनीच्या वाटणीवरून शिवीगाळ तसेच धमकी देवून मानसिक त्रास दिला. त्यानंतर मोहिनी मुरकुटे नगर, शिरसवडी (ता. हवेली) येथे तिच्या वडिलांच्या घरी गेली. वडिलांच्या घरी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी दगडू आणि भानुदास सुक्रे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक पालवे तपास करीत आहेत.