मुलीच्या प्रेमासाठी पत्नीने काढला पतीचा काटा

आपल्या अल्पवयीन मुलीच्या प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच काटा काढला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यात प्रियकर, प्रेयसी आणि मुलीच्या आईचा समावेश आहे. क्राईम वेब सीरिज पाहून संगनमताने कट रचून हा खून केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Wed, 7 Jun 2023
  • 12:07 am
मुलीच्या प्रेमासाठी पत्नीने काढला पतीचा काटा

मुलीच्या प्रेमासाठी पत्नीने काढला पतीचा काटा

पुरावा नष्ट करण्यासाठी पेट्रोल टाकून मृतदेह जाळला, २३० सीसीटीव्ही तपासत पोलिसांनी आरोपींना केले गजाआड

मोनिका येनपुरे 

feedback@civicmirror.in

आपल्या अल्पवयीन मुलीच्या प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच काटा काढला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यात प्रियकर, प्रेयसी आणि मुलीच्या आईचा समावेश आहे. क्राईम वेब सीरिज पाहून संगनमताने कट रचून हा खून केला आहे. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने खून झालेल्या व्यक्तीच्या अंगावर पेट्रोल ओतून तो जाळला होता. त्यामुळे ओळख पटत नसल्याने पुणे ग्रामीण पोलिसांनी शिक्रापूर ते चंदननगर-वडगाव शेरी या भागातील तब्बल २३० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी करत अखेर आरोपींना अटक केली आहे.

शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये १ जून रोजी सकाळी एका अज्ञात व्यक्तीचा जळालेला मृतदेह आढळून आला. जॉन्सन कॅजिटन लोबो असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने पेट्रोल टाकून मृतदेह जाळला होता. मृतदेह पूर्ण जळालेला असल्याने त्याची ओळख पटत नव्हती. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांनी या भागातील २३० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. सीसीटीव्ही तपासामध्ये पोलिसांना एका वॅगनआर कारचा संशय आला. या  वॅगनआरची अधिक माहिती घेतल्यानंतर ही गाडी जॉय कसबे याच्या नावावर असल्याचे समजले. त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता हा धक्कादायक गुन्हा उघडकीस आला. या चौकशीत ॲग्नेलने घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्याने सर्व माहिती दिल्यावर पोलिसांनी ॲग्नेल जॉय कसबे (वय २३), सँड्रा जॉन्सन लोबो (वय ४३) आणि एक अल्पवयीन मुलगी अशा तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी ॲग्नेल जॉय कसबे याचे अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते. अल्पवयीन मुलगी ही सँड्रा लोबो आणि जॉन्सन कॅजिटन लोबो यांची मुलगी आहे. मुलीच्या प्रेमसंबंधाना जॉन्सन यांचा विरोध होता. मात्र, आई सँड्राची संमती होती. त्यातच सँड्रा आणि जॉन्सन यांच्यात परस्परावरील संशयावरून वारंवार भांडणे होत होती. यामुळे जॉन्सन यांचा कायमचा काटा काढण्याच्या उद्देशाने आरोपींनी संगनमताने कट रचला. वेगवेगळ्या क्राईम वेब सीरिज पाहून हा कट रचला.

जॉन्सन याचा ३० मे रोजी रात्री घरात डोक्यात वरवंट्याने मारून, तसेच चाकूने मानेवर वार करून खून केला. त्यानंतर मृतदेह एक दिवस घरात ठेवला. या काळात मृतदेहाची कशी विल्हेवाट लाऊन पुरावा नष्ट कसा करायचा याचा विचार केला. त्याप्रमाणे ३१ मे रोजी रात्रीच्या वेळी  जॉन्सनचा मृतदेह  वॅगनआरमध्ये टाकून पेट्रोल पंपाजवळ आणला. 

पंपाच्या अलीकडे काही अंतरावर थांबून मृतदेहावर पेट्रोल टाकून तो पेटवून दिला. इतकेच नव्हे तर जॉन्सन लोबो हयात आहे, असे नातेवाईकांना भासवण्यासाठी त्याची पत्नी सँड्रा ही जॉन्सनच्या व्हाट्सॲपवर विविध स्टेटस टाकत होती. तसेच चार तारखेला सँड्राचा वाढदिवस होता. त्यावेळी देखील जॉन्सनच्या फोनवरून व्हाट्सॲपला स्टेटस टाकण्यात आले होते. पोलिसांना मृतदेह मिळताच  पोलिसांनी सीसीटीव्हीआधारे तपास करत हा गुन्हा उघडकीस आणला आहे. आरोपींवर कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पुणे ग्रामीण पोलीस करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest