संग्रहित छायाचित्र
एकमेकांकडे खुनशीने पाहण्याच्या रागामधून टोळक्याने प्रतिस्पर्धी तरुणाच्या भागातील नऊ वाहनांची तोडफोड करीत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. ही घटना हडपसर भागातील काळेपडळ येथे म्हसोबा मंदिराजवळ घडली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
साहिल कांबळे असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह अन्य चारजणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता ३२४ (४), १८९ (२), १९१ (१), १९०, महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अभिषेक उद्धव झगडे (वय २४, रा. स्वराज पार्क, म्हसोबा मंदिराजवळ, काळेपडळ, हडपसर ) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कांबळे आणि फिर्यादी झगडे यांच्यामध्ये जुनी भांडणे आहेत. त्यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी वाद देखील झालेले होते. फिर्यादी झगडे आपल्याकडे रागात बघतात असा त्याचा समाज होता. त्यावरून चिडलेल्या कांबळे याने साथीदारांना जमा केले. त्याने काळेपडळ भागात म्हसोबा मंदिराजवळ लावलेल्या वाहनांची तोडफोड केली. तसेच, शिवीगाळ करीत दहशत माजवली. तसेच, लाकडी दांडके उगारून धमकावल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याभागात आरोपींनी दगडफेक केल्याचेही तपासात समोर आले आहे. पोलिसांनी कांबळेला रात्री उशीरा अटक केली. त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.